हरविलेली मुले आई-वडिलांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:28 PM2018-09-05T23:28:13+5:302018-09-05T23:28:34+5:30
बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : चुकीच्या रेल्वेत बसल्याने दिल्लीऐवजी पोहोचले भुसावळला
फैजपूर, जि.जळगाव : दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन दर्ग्यावर दर्शनासाठी जाणारी दोन लहान मुले चुकीच्या रेल्वेत बसल्याने थेट भुसावळला येऊन उतरल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या मुलांना भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेत आधुनिक तंत्राचा वापर करत त्यांच्या हरियाणातील घरी संपर्क करत मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यांच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फरीदाबाद जिल्ह्यातील कुरेशी नगर हरियाणामधील दोन मुले मोहम्मद मेहबूब मोहम्मद मकसूद, सोहम सलीमखान यांना दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्यावर दर्शनासाठी यायचे होते. मात्र ते चुकीच्या रेल्वेत बसल्याने हे मुले थेट भुसावळमध्ये येऊन पोहोचले व रेल्वे स्टेशनबाहेर फिरत असताना त्यांना भुसावळमधील शेख रिजवान शेख रहीम (रा.आझाद नगर, भुसावळ) यांनी पाहिले व त्यांनी बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधत या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. मुले प्रचंड घाबरलेली असल्याने ते माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र त्यांना पोलिसांनी विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सदर घटना सांगितली. या वेळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निशिकांत जोशी, सहाय्यक फौजदार मनोज ठाकरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मुलांच्या फरीदाबाद जिल्ह्यातील कुरेशी गावात संपर्क साधला व येथील पोलिसांच्या मदतीने या मुलांचे फोटो त्यांच्या पालकांना दाखविले. पालकांनी तातडीने त्यांची ओळख पटल्याचे सांगत भुसावळ गाठले. मंगळवारी रात्री चौकशीअंती या मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास करण्यात आला. दरम्यान, मुलांची पालकांशी भेट झाल्याने व पालकांनासुद्धा आपल्या ताब्यात मिळाल्याने यावेळी वातावरण भावनिक झाले होते व त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. याबाबतची नोंद बाजारपेठ पोलिसांमध्ये करण्यात आली आहे.