शिक्षण क्षेत्रातील बदलांवर रविवारी आयएमआरमध्ये 'विचारमंथन सत्र'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:50 PM2019-09-14T18:50:29+5:302019-09-14T19:08:10+5:30
जळगाव - खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी रविवारी अमृत महोत्सवी वर्ष साजरा करित आहे. त्यानिमित्ताने एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ़ अनिल सहस्त्रबुध्दे ...
जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी रविवारी अमृत महोत्सवी वर्ष साजरा करित आहे. त्यानिमित्ताने एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ़ अनिल सहस्त्रबुध्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी १०.३० वाजता आयएमआर महाविद्यालयात 'विचारमंथन सत्र' आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी शनिवारी दिली. याप्रसंगी पत्रकार परिषदेला डॉ. के.पी.राणे, प्रा. संजय पावडे, प्रा. शमा सराफ, प्रा. संजय सुंगधी, संदीप केदार आदी उपस्थित होते.
देशातील शिक्षण क्षेत्रातील बदलांवर आणि धोरणांवर अमिट छाप उमटवणाऱ्या तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी शैक्षणिक क्षेत्रात आज या समस्यांना आपण तोंड देत आहोत, त्याविषयी चिंतन आणि चर्चा या सत्रात होणार आहे. तसेच या चर्चासत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रामाशास्त्री वडेला व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रा. पी़पी़माहुलीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातील संस्थाचालक व त्यांचे प्रतिनिधी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित असतील. या चर्चासत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण याविषयी सुध्दा चर्चा होणार असून प्राचार्य आपल्या अडीअडचणी चर्चासत्राच्या माध्यमातून मांडतील, असेही डॉ़ शिल्पा बेंडाळे यांनी सांगितले.