राज्यातील २७ ठिकाणी वाहनांची ब्रेक चाचणी आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:23 PM2017-10-31T23:23:24+5:302017-10-31T23:25:09+5:30
ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ३१ : ज्या जिल्ह्यात आरटीओचा स्वत: चा २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही, अशा ठिकाणची वाहनांची ब्रेक चाचणी (योग्यता प्रमाणपत्र चाचणी) १ नोव्हेंबरपासून थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात स्वत:च्या मालकीचा ट्रॅक नसल्याने येथे होणाºया चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाहनधारकांना नजीकच्या नंदुरबार, नाशिक, बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे चाचणीसाठी जावे लागणार आहे.
आरटीओची स्वत:ची जागा नसताना अन्य दुसºया खासगी अथवा सार्वजनिक जागेत वाहनांची योग्यता चाचणी घेण्यात येत असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे धोके लक्षात घेता श्रीकांत कर्वे (मुंबई) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.२८/२०१३) दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत १४ सप्टेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने स्वत:ची २५० मीटर जागा नसलेल्या जिल्ह्यातील आरटीओंनी तातडीने ब्रेक चाचणी थांबविण्याचे आदेश दिले होते.
राज्यात २७ ठिकाणी जागा उपलब्ध नाही
राज्यात २७ ठिकाणी आरटीओच्या मालकीचा स्वत:चा २५० मीटरचा ट्रक नाही. त्यामुळे मुख्य सचिवांनी परिवहन बांधकाम विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन तातडीने चाचणीसाठी ट्रॅक तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला गेल्या महिन्यात दिले होते. त्यानुसार सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीत जेथे जागा आहे तेथे तातडीने ट्रक तयार करण्याचे सरकारने सांगितले होते. मात्र अद्यापही राज्यातील २७ ठिकाणी ट्रक तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ३१ आॅक्टोबर ही मुदत संपल्याने १ नोव्हेंबरपासून या चाचण्या घेण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त स.बा.सहस्त्रबुध्दे यांनी मंगळवारी काढले आहेत.
जळगावात ट्रॅक तयार करण्याचे काम सुरु
जळगाव आरटीओ कार्यालयाने मोहाडी शिवारात पाच एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी ट्रक तयार करण्याचे काम सुरु असून डांबरीकरण व कॉँक्रीटीकरणाचे काम बाकी आहे. सध्या पिचींगचे काम सुरु आहे, मात्र काम अपूर्ण असल्याने येथे चाचण्या घेता येत नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. धुळे येथेही ट्रक नाही, त्यामुळे जळगावच्या वाहनधारकांना नंदुरबार, बुलढाणा, मालेगाव, नाशिक व औरंगाबाद या जवळच्या आरटीओ कार्यालयात जावे लागणार आहे. येथील काम पूर्ण झाल्यावरच जळगावात चाचण्या होतील.