मेहुणबाऱ्यात धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:19+5:302021-08-12T04:20:19+5:30
मेहुणबारे बसस्थानक परिसरात राहुल धामणे यांचे श्री गुरुदत्त इलेक्ट्रिक दुकान आहे. धामणे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. ...
मेहुणबारे बसस्थानक परिसरात राहुल धामणे यांचे श्री गुरुदत्त इलेक्ट्रिक दुकान आहे. धामणे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या कुलपाजवळील पट्टी वाकवलेल्या तसेच कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. धामणे यांनी आत दुकानात जाऊन पाहिले असता इलेक्ट्रिक मोटार वायडिंग तांब्याच्या तारांची चोरी झाल्याचे दिसून आले. जवळपास सहा ते सात लाखाची वायडिंग तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केल्याचे बोलले जात आहे.
या घटनेची माहिती धामणे यांनी मेहुणबारे पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरीचा पंचनामा केला. मात्र याप्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. दुकानदार राहुल धामणे यांनी सोमवारीच मालेगाव येथून तीन लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा आणल्या होत्या आणि दुकानात आणखी ४ लाख रुपये किमतीचा माल होता. रात्री या तारा चोरट्यांनी लंपास केल्या. यावरून दुकानदार धामणे हे दुकानात माल कधी आणणार याची चोरट्यांना माहिती असावी. पाळत ठेवून ही चोरी केली गेली असण्याची शक्यता आहे.
या तांब्याच्या तारा एकट्या दुकट्या चोराने चोरून नेल्याचे संभवत नाही. वाहनातून किंवा चोरांच्या टोळीनेच हा डाव साधला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हे इलेक्ट्रिक दुकान फोडण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.