अधिकारी भेटींच्या ‘ब्रेक’सह नागरिकांच्या कामांनाही ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:51+5:302021-05-04T04:07:51+5:30

ब्रेक द चेनचा परिणाम : ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यास ज्येष्ठांना अडचणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू ...

A break from official visits and a break from civic work | अधिकारी भेटींच्या ‘ब्रेक’सह नागरिकांच्या कामांनाही ‘ब्रेक’

अधिकारी भेटींच्या ‘ब्रेक’सह नागरिकांच्या कामांनाही ‘ब्रेक’

Next

ब्रेक द चेनचा परिणाम : ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यास ज्येष्ठांना अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ब्रेक द चेनदरम्यान शासकीय कार्यालयांमध्येही भेटींवर निर्बंध घालण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना भेटून आपल्या तक्रारी मांडता येत नसल्याने सामान्य नागरिकांच्या कामांनाही ‘ब्रेक’ लागला आहे. याशिवाय लोकशाही दिनदेखील ऑनलाईन होत असल्याने तक्रारींची प्रत तालुका पातळीवरच राहत असल्याने समस्यांचे निवारण होण्यास अडथळे येत आहे. विशेष म्हणजे लोकशाही दिन ऑनलाइन होत असल्याने तक्रारींची संख्याही २० ते २५ टक्‍क्‍यांवर आली आहे. पाच महिन्यात जिल्हाभरातून केवळ ७८ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ऑनलाईन तक्रारीची स्थिती होती तीच स्थिती यंदादेखील एप्रिल महिन्यात ओढावली आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला व त्याचा विविध क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. यात शासकीय कार्यालयाशी संबंधित असणाऱ्या आपल्या समस्या मांडण्यावरदेखील निर्बंध आले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोनामुळे लोकशाही दिन बंद झाला व आठ महिने हा लोकशाही दिन झालाच नाही.

२३ मार्च २०२० रोजी लॉकडाउन घोषित होण्यापूर्वी मार्च महिन्यात असलेल्या पहिल्या सोमवारी, २ मार्च २०२० रोजी लोकशाही दिन झाला. त्यानंतर प्रत्येक महिन्याला जसजसे लाॅकडाऊन वाढत गेले तसे लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन्ही वर्षातील एप्रिल महिना सारखाच

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकशाही दिन होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचे निवारणही व्हावे यासाठी या तक्रारी मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मेलवर तक्रारी प्रशासनाकडे पाठविला जाऊ लागल्या. मात्र लोकशाही दिनातील तक्रारींचे स्वरूप पाहिले तर निवृत्ती वेतन, पतसंस्था ठेवी अशा ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असणाऱ्या तक्रारीच अधिक असायच्या. मेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा असली तरी या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या तक्रारी मेलवर नोंदविताना अडचणी येऊ लागल्या. आता यंदादेखील एप्रिल महिन्यात अधिकाऱ्यांच्या भेटी बंद करण्यात आल्याने नागरिकांच्या तक्रारी मेलद्वारे मागविल्या जात आहे. यातही ज्येष्ठ नागरिकांना तक्रारी करण्यास अडचणी येत आहे. गेल्या वर्षी लोकशाही दिन बंद होता; मात्र यंदाच्या एप्रिल महिन्यात ऑनलाइन पद्धतीने झालेल्या लोकशाही दिनी २१ तक्रारी दाखल झाल्या.

यंदा भेटीही बंद

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे सोमवार व गुरुवारी नागरिकांना वेळ देत असतात. लोकशाही दिन बंद असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान नागरिक आपल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडत होते. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग अधिकच असल्याने शासकीय कार्यालयांमध्येदेखील भेटीगाठीवर निर्बंध आणले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना थेट भेटता येत नसून त्यांना आपल्या तक्रारी ई-मेलद्वारे कराव्या लागत आहे.

आलेल्या तक्रारी त्या-त्या विभागाला रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात मेलवर नागरिक ज्या तक्रारी पाठवित आहे, त्या तक्रारी ज्या-ज्या विभागाशी संबंधित आहे, त्या-त्या विभागाला त्या पाठवून जिल्हाधिकारी अथवा संबंधित अधिकारी तक्रारीचा निपटारा करण्यासाठी सूचना देत आहे. यामध्ये ज्या विभागाने तक्रारी मार्गी लावल्या त्याचा अहवाल मागविला जातो. मात्र महापालिका, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय व इतरही विभागांकडे पाठविलेल्या तक्रारींचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता नागरिकांच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.

तक्रारींची संख्या घटली

आपल्या तक्रारी मांडण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर साधारणपणे २० ते २५ तक्रारी मांडल्या जात होत्या. मात्र आता ऑनलाईनवर हे प्रमाण १० ते १२ तक्रारींवर आले आहे.

लोकशाही दिनातही तक्रारी कमीच

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लोकशाही दिन रद्द झाला होता. त्यानंतर डिसेंबरपासून लोकशाही दिन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाला. मात्र या ऑनलाईन लोकशाही दिनीदेखील तक्रारींची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

लोकशाही दिनात महिनानिहाय तक्रारींची संख्या

महिना - तक्रारींची संख्या

डिसेंबर २०२०- १०

जानेवारी २०२१- १०

फेब्रुवारी- २८

मार्च- ९

एप्रिल-२१

एकूण - ७८

Web Title: A break from official visits and a break from civic work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.