ब्रेकिंग: जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा तर 100 कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 05:34 PM2019-08-31T17:34:31+5:302019-08-31T17:38:43+5:30
तसेच या प्रकरणातील 30 नगरसेवकांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
जळगाव - राज्यभरात गाजलेला घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर सुरेश जैन यांना 7 वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षापासून घरकुल घोटाळ्याचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं.
तसेच या प्रकरणातील 30 नगरसेवकांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास इ.स. १९९९ मध्ये सुरुवात झाली. मात्र या योजनेतील सावळागोंधळ सन २००१ मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले.
पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाºया ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही. याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली.