१८ वर्षांच्या पाडवा पहाटची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:41+5:302020-12-31T04:16:41+5:30
जळगाव : वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना कोरोनामुळे रसिकांना मुकावे लागले. त्यात दिवाळी पाडव्याची पहाट अधिक सुखकर करणाऱ्या ...
जळगाव : वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना कोरोनामुळे रसिकांना मुकावे लागले. त्यात दिवाळी पाडव्याची पहाट अधिक सुखकर करणाऱ्या पाडवा पहाट या १८ वर्षांपासून अविरत चालणाऱ्या कार्यक्रमातही खंड पडला आणि दिवाळीची ही पहाट रसिकांसाठी यंदा सुनीसुनी ठरली.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे २००२ पासून अविरत कुठलाही खंड पडू न देता बलिप्रतिपदेच्या पहाटे हा सांस्कृतिक संगीत सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. यंदा मार्च महिन्यापासून कोरोनामुळे सर्व यंत्रणा ठप्प पडल्या. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच यंत्रणा बंद होत्या. सहा महिन्यांपर्यंत विविध बंधने कायम होती, त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने अखेर नाइलाजास्तव चांदोरकर प्रतिष्ठानला ही १८ वर्षांची परंपरा खंडित करावी लागली. आपण आयुक्तांची भेट घेतली होती, मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले आणि हा कार्यक्रम यंदा रद्द करावा लागल्याचे प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सांगितले.
रसिकांचा आग्रह
पाडवा पहाट हा कार्यक्रम रसिकांच्या मनात ठाव घेतलेला कार्यक्रम झाला होता. यामुळे अचानक तो रद्द झाल्याने अनेक रसिकांनी हा कार्यक्रम घेण्याचा आग्रहही केला होता. वारंवार दीपक चांदोरकर यांना कार्यक्रमाबाबत विचारणाही झाली होती. सलग १४ वर्षे कार्यक्रम सतरामजलीच्या प्रांगणात होत होता. त्यानंतर तीन वर्षे गांधी उद्यानात सकाळी ६ ते ८ या वेळेस हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता.
अन्य दोन कार्यक्रमही रद्द
पाडवा पहाटप्रमाणेच चांदोरकर प्रतिष्ठान आणि एनसीपीए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मल्हार उत्सव तसेच स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे दीपक चांदोरकर यांनी सांगितले.