‘ब्रेथ ॲनालाझर‘ धूळखात; जिल्ह्यात तळीराम झोकात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:07+5:302021-02-11T04:18:07+5:30
कोरोनामुळे यंत्र वापरास बंदी : अद्यापही शासनाकडून आदेश नाहीत जळगाव : कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोणताही व्यक्ती एकमेकांच्या ...
कोरोनामुळे यंत्र वापरास बंदी : अद्यापही शासनाकडून आदेश नाहीत
जळगाव : कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोणताही व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येणार नाही यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडण्याची गरज भासलीच तर तोंडाला मास्क सक्तीचा करण्यात आला होता, त्याच धर्तीवर तळीराम ओळखण्यासाठी पोलिसांकडे असलेले ब्रेथ ॲनालाझयर यंत्र वापरासही बंदी घालण्यात आली असून आजही ती कायम आहे. त्यामुळे ‘ब्रेथ ॲनालाझर‘ धूळखात पडले असून तळीराम मात्र जोरात सुटलेले आहेत.
कोरोनाचा प्रसार आता कमी झाला आहे, दुसरीकडे मद्याची दुकानेही सुरु झालेली आहेत. असे असले तरी ‘ब्रेथ ॲनालाझर‘ यंत्र वापरण्याची परवानगीच मिळालेली नसल्याने मद्यपींवर कारवाई करताना पोलिसांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधी जानेवारी महिन्यात शहर वाहतूक शाखेच्या ‘इंटरसेफ्टर व्हेईकल’ या अत्याधुनिक वाहनातील ‘ब्रेथ ॲनालाझर‘ द्वारे १२ तर फेब्रुवारी महिन्यात ५ अशा १७ तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात ३ जणांना पकडून त्यांची रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ३१ डिसेंबरच्या रात्रीही १४ तळीरामांवर कारवाई करण्यात आली, मात्र यात ‘ब्रेथ ॲनालाझर‘ चा वापर झाला नाही. वर्षभरात फक्त ३५ तळीरामांवरच कारवाई झाली.
आश्चर्यम ! मार्चनंतर कोणीच ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह केले नाही
कोरोनाच्या काळात पोलिसांकडे ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ ची एकही कारवाई झाल्याची नोंद पोलिसांकडे नाही, अर्थात ‘ब्रेथ ॲनालाझर‘ यंत्र वापरण्याचीच परवानगी वाहतूक पोलिसांना नव्हती. याचा अर्थ असाही नाही की लॉकडाऊन काळात कोणीच मद्यप्राशन केले नाही व वाहन चालविले नाही. मद्य विक्रीलाही बंदी असली तरी या काळात लपूनछपून मद्य विक्री सुरुच होती, त्याच काळात जळगावात अवैध मद्य तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले. असे असले तरी कागदावर मात्र एकही ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’कारवाई नाही.
कोरोना काळात दारुचा खप घटला, मात्र महसुलात वाढ
कोरोना काळात मद्य विक्रीलाही बंदी होती. टप्प्याटप्प्याने मद्य विक्री दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली होती, त्यामुळे या काळात दारुचा खप घटला असला तरी परवानानूतनीकरणातून महसूलात वाढ झाली आहे. जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाला ९.३४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. २०१९ मध्ये याच कालावधीत फक्त २.५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी वार्षिक उद्दिष्ट १९.७१ कोटी रुपये होते तर प्रत्यक्षात ८.४३ कोटीचा महसूल प्राप्त झाला होता. २०२०-२१ मध्ये २१.०५ उद्दिष्ट होते, तर प्रत्यक्षात ९.३४ कोटीचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाला होता.
कोट...
लॉकडाऊन काळात ‘ब्रेथ ॲनालाझर’ यंत्र वापरण्याचीच परवानगी नव्हती. तरी देखील वर्षभरात ३५ जणांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ ची कारवाई केली आहे. ३१ डिसेंबरला सर्वाधिक १४ तर सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात १२ जणांवर कारवाई केली. शासनाने अजूनही ‘ब्रेथ ॲनालाझर‘ वापरण्यास परवानगी दिलेली नाही.
-देवीदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
जानेवारी : १२
फेब्रुवारी : ०५
मार्च : ००
एप्रिल : ००
मे : ००
जून : ००
जुलै : ००
ऑगस्ट : ००
सप्टेबर : ०१
ऑक्टोबर : ००
नोव्हेंबर : ०३
डिसेंबर : १४