नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना साडेअकरा लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:58+5:302021-05-07T04:16:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सरकारी व खासगी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ३२ तरुणांना ११ लाख ५० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सरकारी व खासगी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ३२ तरुणांना ११ लाख ५० हजार रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आप्पासाहेब महादेव बजबळकर (रा. डोंबिवली, ता. कल्याण जि. ठाणे, मूळ रा. तिप्पेहली, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच गुन्हा २०१८ मध्ये मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.
ज्ञानेश्वर निंबा पाटील (वय ६०, रा. डोणगाव, ता. यावल) यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील शेती करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा भूषण व संशयित आप्पासाहेब महादेव बजबळकर (वय २७) याच्याशी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील जोंधळे महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. त्यानंतर २०१७-१८ मध्ये भूषण पुण्यात खासगी नोकरी करीत असताना अप्पासाहेब हा त्याला तिथे भेटला. या ओळखीतून आप्पासाहेब बजबळकर याने मी तुला शासकीय नोकरीत लावून देऊ शकतो त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. शासकीय नोकरी मिळेल या आशेने पाटील यांनी मुलगा भूषण व उमेश या दोघांचे पहिला टप्प्यात २०१७ मध्ये अडीच लाख रुपये जळगावातील महात्मा गांधी उद्यानाच्या समोर दिले. या वेळेत दोन्ही मुले या ठिकाणी हजर होती. त्यानंतर भूषण याने पुन्हा ३० हजार रुपये कल्याण रेल्वे स्टेशनवर दिले. यावेळी विवेक शिवाजी पाटील (रा. मुकटी, ता. धुळे) हा तरुण हजर होता. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी पुन्हा कल्याण व पुणे येथे १ लाख २० हजार रुपये दिले. पाटील यांनी दोन्ही मुलांचे पाच लाख रुपये दिले. ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलांसाठी आप्पासाहेब याने वेळोवेळी पाच लाख रुपये घेतले. नोकरी लागत नाही, त्यासाठीचे कागदपत्रे घेतले नाहीत. संशय बळावला म्हणून त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला असता त्याने कल्याण, डोंबिवली येथील बँकांचे धनादेश दिले, मात्र बँकेत वाटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
खासगी नोकरीसाठी ३० तरुणांची फसवणूक
आप्पासाहेब याने, माझी कंपन्यांमध्येही मोठी ओळख आहे. नोकरी लावायची असेल तर प्रत्येकी २० ते ३० हजार रुपये लागतील, असे सांगून भूषण चव्हाण याच्या मार्फत स्वप्निल पाटील (पुणे) व सागर कान्हे (नाशिक) याच्यासह ३० मुलांकडून २०१८ मध्ये डोंबिवलीत ६ लाख ५० हजार रुपये घेतले. या मुलांना नोकरी लागली नाही म्हणून त्याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार देण्यात आलेली आहे, असे जळगावच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.