३२ हजाराची घेतली लाच ; लाचखोर जिल्हा लेखापरीक्षकाला सुनावली सात आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:44 PM2020-08-06T13:44:07+5:302020-08-06T13:44:19+5:30
जळगाव : लेखापरीक्षकाची छाननी करुन त्याचा चांगला अहवाल तयार करण्यासाठी ३२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब बाजीराव ...
जळगाव: लेखापरीक्षकाची छाननी करुन त्याचा चांगला अहवाल तयार करण्यासाठी ३२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब बाजीराव जंगले (५१,रा. गंगासागर अपार्टमेंट, रामानंदनगर) याला न्यायालयाने गुरुवारी सात आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जंगले याने बुधवारी सायंकाळी तीन प्रमाणित लेखा परीक्षकांकडून ३२ हजार रुपयांची लाच घेतली होती. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जंगले याला अटक केली. जंगले याने तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये, साक्षीदार यांच्याकडून दहा हजार रुपये, दुसरे साक्षीदार २० हजार रुपये व तिसरे साक्षीदार यांच्याकडून पंधरा हजार अशी एकूण ५२ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ५आॅगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता लाचेच्या मागणी रकमेपैकी ३२ हजार रुपये घेताना जंगलेला पंचांच्या समक्ष पकडण्यात आले.त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक (सुधारीत)कायदा सन २०१८चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जंगले याला उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले.जंगले हा औरंगाबाद येथील मूळ रहिवासी आहे. त्यामुळे त्याच्या नावावर स्थावर व जंगम मालमत्ता तसेच बँक खात्याची माहिती मिळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.या गुन्ह्याचा तपास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जीएम ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.