वीज जोडणीसाठी घेतली लाच : वरिष्ठ तंत्रज्ञासह कंत्राटी वायरमन अडकला एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 08:59 PM2021-03-06T20:59:48+5:302021-03-06T20:59:57+5:30
जळगाव - अमोदा खुर्द येथील हॉटेलच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्याकडून सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वीज वितरण ...
जळगाव - अमोदा खुर्द येथील हॉटेलच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्याकडून सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र धनसिंग पाटील (४७, रा. फुपनगरी, ह.मु. एमएसईबी कॉलनी, जळगाव) व कंत्राटी वायरमन प्रल्हाद उत्तम सपकाळे (४१, रा. विदगाव) यांना शुक्रवारी रंगेहाथ पकडले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार शेतकरी यांचे अमोदा खुर्द येथे स्वत:चे शेत आहे. शेतात जत्रा नावाने त्यांचे हॉटेल आहे. हॉटेलच्या वीज जोडणीसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अर्ज केला होता. डिमांड नोटदेखील भरली होती. मात्र, वीज जोड जोडून देण्यासाठी विदगाव सबस्टेशनचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पाटील व कंत्राटी वायरमन प्रल्हाद यांनी तक्रारदार शेतकरी यांच्याकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी शेतकऱ्याने जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी हॉटेल जत्रा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. अन् त्याठिकाणी कंत्राटी वायरमन याला सहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पथकाने पकडले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींनी केली आहे.