हळदीच्या दिवशीच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 PM2021-03-09T16:28:44+5:302021-03-09T16:29:18+5:30
लग्नाची घटीका एक दिवसावर असताना पेठमधील वधुपित्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : लग्नाची घटीका एक दिवसावर असताना पेठमधील वधुपिता सुपडू बळीराम पाटील (४५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हळदीच्या दिवशीच घडल्याने आनंदावर विरजण पडले आहे.
पेठमधील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी सुपडू बळीराम पाटील यांची कन्या अंकिता हिचा विवाह हिवरखेडा दिगर येथील चेतन ज्ञानेश्वर होळे या युवकासोबत निश्चित झाला आहे. बुधवारी विवाह संपन्न होणार होता. मंगळवारी हळदीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. पाहुण्याची वर्दळ सुरू होती. सुपडू पाटील पाचोरा येथून घरी येणार होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते.
सुपडू पाटील यांचा पाचोरा येथेच हृदय विकाराने मृत्यू झाला. बातमी लगीनघरी धडकताच आंनदाचे वातावरण शोकाकुल वातावरणात रूपांतरित झाले. कन्या बाेहल्यावर चढण्यापूर्वीच पित्याचे अंत्यदर्शन घेण्याची दुर्दैवी प्रसंग अंकिता व परिवारावर ओढावल्याने उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
परिवार उघड्यावर
सुपडू पाटील अल्पभूधारक शेतकरी असून कामानिमित्त पाचोरा येथे होते, परिस्थिती जेमतेम आहे. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा परिवार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी विशाल पाटील याचे ते वडील आहेत. घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने परिवार उघड्यावर आला आहे. मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.