अठरा मिनिटात लांबविला नववधूचा लाखोचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:23 AM2019-01-14T11:23:08+5:302019-01-14T11:24:26+5:30
जळगावातील वाघ नगर परिसरात घरफोडी
जळगाव : अंगावर चादर, हाफ चड्डी घालून आलेल्या पाच चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा वाकवून कुलुप तोडून अवघ्या अठरा मिनिटात रवींद्र आत्माराम ठाकूर (वय ५२) यांच्या सुूनेचे २५ हजार रुपये रोख व ९० हजार रुपये किमतीचे दागिने असा एक लाख १५ हजार रुपयांचे ऐवज लांबविण्यात आल्याची घटना वाघ नगर परिसरातील श्याम नगरात रविवारी पहाटे घडली. दरम्यान, हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र ठाकूर हे नेपानगर येथील सरकारी पेपर मील मध्ये नोकरीला आहेत. जळगाव येथील वाघ नगर परिसरातील श्याम नगरातही त्यांचे घर आहे. या घरात मुलगा संदीप, सून पूजा, लहान मुलगा शुभम असे राहतात. संदीप याचे २९ डिसेंबर रोजी लग्न झाले. त्यामुळे संदीप व त्याची पत्नी पूजा असे दोन्ही जण कुलुमनाली येथे फिरायला गेले होते. शुभम हा बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी व रविवार सुटी असल्याने तो शुक्रवारीच सायंकाळी नेपानगर येथे वडीलांकडे गेला होता. त्यामुळे घराला कुलुप होते.
२.०७ ते २.२५ यावेळेत काम फत्ते
२ वाजून ७ मिनिटांनी आलेले चोरटे २.२५ वाजता ठाकूर यांच्या प्रवेश केला. १८ मिनिटात त्यांनी टॉमीने कडीकोयंडा वाकवून घरात प्रवेश करुन साहित्याची नासधूस करुन बेडमध्ये ठेवलेल्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये असलेले २५ हजार, सोन्याची मंगलपोत, दोन अंगठ्या व कानातील दागिने असे ३१ ग्रॅम दागिने काढून पलायन केले. शेजारी राहणारे रतनकुमार थोरात यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेºयात चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहेत.
गेल्यावर्षीही झाली होती घरफोडी
रवींद्र ठाकूर यांच्या घराच्याच शेजारी गेल्यावर्षी घरफोडी झाली होती.आता पुन्हा याच भागात चोरी झाली आहे. या घटनेतील चोरटे २० ते ३० वयोगटातील आहेत. प्रत्येकाने अंगावर शाल किंवा चादर घेतलेली असून सर्वांची हाफ पँट आहे. चेहराही झाकलेला आहे.
वीज नाही, पोलीस गस्त नाही
श्याम नगर हा सावखेडा शिवाराकडे शेवटचा आहे. या भागात वीज पुरवठा सतत बंद असतो. पथदिवे बंद आहेत. त्याशिवाय पोलिसांची गस्तही कधीच होत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. रात्री घरफोडीचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शेजारीला लोकांनी ठाकूर यांचा पुतण्या यश सोनवणे याला फोन करुन माहिती दिली होती. त्यानुसार रवींद्र ठाकूर रविवारी सकाळी नेपानगर येथून जळगावात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजारच्या वृध्देला पाहताच लपले चोरटे
पहाटे २ वाजता चोरटे श्याम नगरात आले असता झोपेतून जागे झालेल्या शंकुतला पुंडलिक ठाकरे (वय ६५) या वृध्देला गल्लीतून पाच जण जाताना दिसले. आपण कोणाच्या तरी नजरेस पडलो असे लक्षात येताच चोरटे ठाकूर यांच्या घराच्या भींतीच्या आडोशाला लपले. हा प्रकार शकुंतला ठाकूर यांनी मुलाला सांगितले. त्यांनी लागलीच शेजारच्या लोकांना मोबाईलवरुन माहिती दिली, तो पर्यंत बराच वेळ झाला होता. त्यामुळे चोरटे घरातून चोरी करुन पसार झाले होते. ते नेमके कोणत्या दिशेने गेले हे स्पष्ट झाले नाही.