अंत्ययात्रा घेवून जाताना पूल कोसळला, पार्थिवासह नागरिक कोसळले नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:35 PM2018-11-19T22:35:56+5:302018-11-19T22:38:36+5:30
ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यालगत प्रजापत नगरासमोर लेंडीनाल्यावर बांधलेला लोखंडी पूल सोमवारी दुपारी १२.१० वाजता पुलावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक कोसळला.
जळगाव-शहराकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यालगत प्रजापत नगरासमोर लेंडीनाल्यावर बांधलेला लोखंडी पूल सोमवारी दुपारी १२.१० वाजता पुलावरून अंत्ययात्रा जात असताना अचानक कोसळला. यामुळे पार्थिवासह सुमारे १२ ते १५ नागरिक देखील नाल्यात कोसळले. यामध्ये १० ते १२ जण जखमी झाले आहेत.
सोमवारी पहाटे शनिपेठेतील रहिवासी असलेले नारायण आप्पा हरी हिवरे-गवळी यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी १२ वाजता काढण्यात आली. ममुराबाद रस्त्यालगत असलेल्या लिंगायत गवळी समाजाच्या दफनभुमीकडे ही अंत्ययात्रा लेंडी नाल्यावर असलेल्या जुन्या लोखंडी पुलावर आल्यावर अचानक हा पूल तुटला. यामुळे पार्थिवाला खांदे देणाºया चार नागरिकांसह मागे असलेले काही नागरिक देखील नाल्यात कोसळले. सर्व जण पुलासकट नाल्यात कोसळल्यामुळे अनेकांचे कपडे चिखलाने भरले होते.
पुल कोसळल्यावरही खांदा ठेवला कायम
अप्पा हरि गवळी यांच्या अंत्ययात्रेदरम्यान, त्यांच्या पार्थिवाला उमेश गवळी, महेश गवळी, लवेश गवळी, अमोल गवळी, दीपक गवळी यांनी खांदा दिला होता. पूल कोसळून नाल्यात पडल्यावर देखील या पाचही जणांनी पार्थिवाला दिलेला खांदा कायम ठेवला. त्यामुळे पार्थिव असलेली तिरडी नाल्यात कोसळली नाही. दरम्यान, खांदा देणाºया पाचही जणांना पुलाचे लोखंड लागल्याने किरकोळ जखमा झाल्या.