दुसरी ते दहावीसाठी यंदाही शाळांमध्ये सेतू अभ्यासक्रम
By अमित महाबळ | Published: June 30, 2023 10:48 PM2023-06-30T22:48:59+5:302023-06-30T22:49:10+5:30
इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षीदेखील सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये केली जाणार आहे.
जळगाव : इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षीदेखील सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांमध्ये केली जाणार आहे. त्यासाठी आधीच्या इयत्तांमधील महत्वाच्या अध्ययन घटकांवर आधारित कृती पत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार राज्यातील विद्यार्थी भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांच्या अभ्यासात मागे असल्याचे आढळले होते. यासाठी गेली दोन वर्षे सेतू अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविला गेला. तो परिणामकारक ठरला आहे. विद्यार्थी पुढील वर्गात जाताना मागच्या वर्गातील विषयनिहाय क्षमतांची तपासणी सेतूद्वारे केली जाते. सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मराठी व उर्दू माध्यमांच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा व अन्य व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. हा अभ्यास दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी घेण्यात आल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी शिक्षकांनी ठेवायच्या आहेत. इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी तर सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयांचा सेतू अभ्यास तयार केलेला आहे.
सेतू अभ्यासाचे टप्पे
पूर्व चाचणी - ३० जून ते ३ जुलै
२० दिवसांचा सेतू अभ्यास - ४ जुलै ते २६ जुलै
उत्तर चाचणी - २७ ते ३१ जुलै
जळगाव जिल्ह्यातील शाळा
प्राथमिक शाळा - १६७१
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा - ७९४
माध्यमिक शाळा - ८५९