उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:32+5:302021-08-14T04:20:32+5:30
महागाईने चिंता : सिलिंडरचे दर पोहोचले ८४० रुपयांवर स्टार १०४५ जळगाव : केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू ...
महागाईने चिंता : सिलिंडरचे दर पोहोचले ८४० रुपयांवर
स्टार १०४५
जळगाव : केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याचे जाहीर केले आहे. मात्र पहिले सिलिंडर तर मोफत मिळेल; मात्र सध्याचे सिलिंडरचे वाढलेले दर पाहता नंतर सिलिंडर घेणे कसे परवडेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अनेक महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळल्या आहेत.
‘स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस उपलब्ध करुन दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच महिलांचे सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. यात पहिल्या टप्प्यात अनेक महिलांनी गॅस कनेक्शन तर घेतले मात्र नंतर त्यांना दुसरे सिलिंडर भरताना चांगलेच जड जाऊ लागले. त्यामुळे या महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करू लागल्या. आता उज्ज्वला योजना-२ची घोषणा झाली असून त्यासाठीही केवायसी करणे सुरू आहे. यातही तशीच स्थिती उद्भवते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन - २,३९,७४२
गॅस सिलिंडरचे दर
जानेवारी २०२० - ५९९.००
जानेवारी २०२१ - ६९९.५०
एप्रिल २०२१- ८१४.५०
ऑगस्ट २०२१ - ८४०.००
सिलिंडर भरणे कसे परवडणार?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळाले; मात्र गॅसचे वाढते दर चिंता वाढवित आहेत. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करणे बरे.
- वंदना बारी, गृहिणी.
मोफत गॅस मिळणे आनंदाची बाब आहे; मात्र सिलिंडरचे वाढते दर पाहता ते विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे गॅसपेक्षा चूल बरी अशी स्थिती झाली आहे.
- असमद पिंजारी, गृहिणी
गॅस सिलिंडरचे दर वारंवार वाढत असून ते घेणे महागात पडत आहे. कोरोना काळात घराचा खर्च कसाबसा करीत असताना एवढे महागडे सिलिंडर घेणे कसे परवडणार.
- आशाबाई सोनवणे, गृहिणी.