अटलबिहारी वाजपेयींच्या कर्तृत्व गुणांना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:28 PM2018-08-20T17:28:56+5:302018-08-20T17:29:17+5:30
चाळीसगावला शोकसभेत सर्वपक्षीयांतर्फे आदरांजली
चाळीसगाव, जि.जळगाव : माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भाजपातर्फे रविवारी सायंकाळी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत वाजपेयी यांची गुणवैशिष्ट्ये मांडत अनेकांनी भावना व्यक्त केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वयोवृद्ध नेते उदेसिंग पवार होते.
याप्रसंगी आमदार उन्मेष पाटील यांनी आदरांजली वाहताना सांगितले की, प्रेरणादायी दीपस्तंभ म्हणून अटलजी नेहमी स्मरणात राहतील. त्यांनी नेहमीच उज्वल भारताची स्वप्ने बघितली. द्रष्टा विचारवंत, थोर साहित्यिक, समन्वयवादी भूमिकेचा आग्रह धरणारा निर्लेप राजकारणी अशा गुणांची त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वात बेरीज झाली होती.
व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी त्यांच्या सर्वांना बरोबर घेऊन राजकारण करण्याचे कसब आणि भूमिका कौतुकास्पद ठरते, असे स्पष्ट केले. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे सुसंस्कृत कार्य विषद केले.
माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांनीदेखील त्यांच्या चतु:रस्त्र व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेतला. पालिकेतील भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी यांनी त्यांच्या शालिन कर्तृत्वाला उजाळा दिला. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व जि.प.चे राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी विरोधकांना सन्मानाने वागविणारे नेतृत्व म्हणून ते लक्षात राहतात, असे सांगितले.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी व्यक्तीच्या मृत्यू पश्चात शब्द, कर्म आणि कार्य रुपाने अटलबिहारी वाजपेयी कसे कालातीत ठरतात यावर प्रकाश टाकला. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, प्रतिमदास रावलानी, तुकाराम गवळी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या आठवणी जागविल्या.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम कोळी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक खलाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, बाजार समितीचे संचालक अॅड. रोहिदास पाटील, खादी ग्रामोद्योग संस्थेचे अध्यक्ष किसनराव जोर्वेकर, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, काँग्रेसचे अॅड. ईश्वर जाधव, नगरसेवक आनंदा कोळी, संस्कार भारतीच्या सुनीता घाटे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, उद्धवराव महाजन, नगरसेविका संगीता गवळी, अॅड. आशा शिरसाट, डॉ. नरेश निकुंभ, अविनाश सूर्यवंशी, प्रफुल्ल साळुंखे, हाजी रफिक, विद्या भारतीचे रमेश पोतदार यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
या वेळी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, जि.प.चे माजी सभापती राजेंद्र राठोड, नगरसेवक श्यामलाल कुमावत, सुरेश स्वार, संजय रतनसिंग पाटील, विजया प्रकाश पवार, अरुण अहिरे, पं.स.चे उपसभापती संजय पाटील, डॉ. संजय देशमुख, दिनेश बोरसे यांच्यासह विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे यांनी केले.