गेंदालाल मिल येथे बंद घर फोडले; २० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:14+5:302021-03-20T04:15:14+5:30
जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परिसरातील अकिलाबी शेख अनिश यांचे बंद घर फोडून २० हजार रुपये किमतीचा ऐवज ...
जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परिसरातील अकिलाबी शेख अनिश यांचे बंद घर फोडून २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी १८ सायंकाळी उघडकीला आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अकिलाबी शेख अनिश या गेंदालाल मिल येथे पती व मुलांसह राहतात. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १३ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बहिणीकडे लग्न असल्यामुळे त्या पती व मुलासह अमरावती येथे गावाला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. १७ मार्च रेाजी त्या अमरावतीत असताना शेजारच्यांनी फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने त्याच दिवशी सायंकाळी जळगाव गाठले. घरी पोहोचल्यानंतर घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील गॅस सिलिंडर, हंडा, कळशी, पाण्याची मोटार आदीसह कपाटातील १९ हजार रुपये रोख असा एकूण २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. या प्रकरणी अकिलाबी शेख अनिस यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काॅ. उमेश भांडारकर करीत आहेत.