साडेपाच लाखांत गंडा घालणाऱ्या भाऊ-बहिणीला राजस्थानातून अटक, जळगाव सायबर पोलिसांची कामगिरी
By विजय.सैतवाल | Published: February 18, 2024 11:44 PM2024-02-18T23:44:36+5:302024-02-18T23:46:14+5:30
माहितीचे विश्लेषण करुन यातील संशयित हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले
जळगाव : रसायन खरेदी-विक्रीमध्ये गुंतवणूक करुन अधिक नफ्याचे अमिष दाखवत एका तरुणाची ५ लाख ६४ हजारांमध्ये फसवणूक करणाऱ्या दोघा भाऊ बहिणींना जळगाव सायबर पोलिसांनी राजस्थानातील भिलवाडा येथून अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी व पोउनि दिगंबर थोरात, पोहेका राजेश चौधरी, मिलिंद जाधव, गौरव पाटील, दीपक सोनवणे, प्रवीण वाघ, दीप्ती अनफाट यांनी संबधित बँक व मोबाईल कंपनीकडे पत्रव्यवहार करुन आवश्यक माहिती मिळवली. माहितीचे विश्लेषण करुन यातील संशयित हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने राजस्थानातील भिलवाडा येथील शास्त्रीनगर येथून चंदाकुमारी उर्फ तानिया सत्यनारायण शर्मा (३०) व भरत सत्यनारायण शर्मा, (२७, भिलवाडा, राजस्थान) यांना अटक केली. त्यांच्याकडून ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे दोन मोबाईल, पाच सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात येथे हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.