प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाऊ, दादा अन् मामाचा एसटीने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:42+5:302021-08-12T04:19:42+5:30
सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर आमदारांना सर्वसामान्यांशी बोलण्यास आणि त्यांच्यात मिसळण्यासही वेळ नसतो, ...
सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर आमदारांना सर्वसामान्यांशी बोलण्यास आणि त्यांच्यात मिसळण्यासही वेळ नसतो, असे नेहमी म्हटले जाते. आमदार झाल्यावर त्यांचा दौरा नेहमी वातानुकूलित चारचाकी गाडीतूनच असतो. मग, एसटी बसमधून प्रवास करायला वेळ कसा असणार, असा प्रश्न सहजच सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातो. मात्र प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव शहरचे आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांनी प्रवास केला आहे.
जिल्ह्यातील आमदारांच्या एसटी प्रवासाची एसटी महामंडळाकडे लेखी नोंद नसल्यामुळे, त्यांनी तोंडी दिलेल्या माहितीनुसार आणि प्रत्यक्ष आमदारांशी `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या चर्चेनुसार, गेल्या पाच वर्षात माजी आमदारांमध्ये सध्याचे खासदार असलेले उन्मेश पाटील यांनी बसमधून प्रवास केला आहे, तर सध्याच्या विद्यमान आमदारांपैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुरेश भोळे यांचा समावेश आहे.
कधी एसटी प्रवास केला आहे का?
तीन वर्षांपूर्वी पाळधी ते जळगावदरम्यान अचानक एसटी प्रवास केला होता. या प्रवासात प्रवासी आणि विद्यार्थांच्या समस्या जाणून घेण्याचा योग आला होता. त्यावेळी विद्यार्थांच्या मागणीनुसार जादा बसेस सोडण्याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या होत्या.
- गुलाबराव पाटील, पालकमंत्री
आमदार झाल्यानंतर प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुक्ताईनगर ते जळगावदरम्यान सपत्निक एसटी बसने प्रवास केला होता. या प्रवासात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थांच्या प्रवासाबाबत असलेल्या अडचणी जाणून घेण्याचा योग आला होता. या अडचणी सोडविण्यासाठी महामंडळाकडे पाठपुरावाही केला होता.
- चंद्रकांत पाटील, आमदार, मुक्ताईनगर
पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त पाचोरा ते वाघळीपर्यंत बसमधून प्रवास केला आहे. या प्रवासात त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. यावेळी प्रवाशांनी अनियमित बससेवा असेल किंवा जादा बसेस सोडण्याबाबत अडचणी सांगितल्या होत्या. या समस्या सोडविण्याबाबत महामंडळाकडे पाठपुरावाही केला होता.
- सुरेश भोळे, आमदार
चारचाकीतून फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत ?
आमदारांनी सर्वसामान्यांच्या प्रवासातील अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी बसमधून प्रवास केला, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, आमदारांना एसटीतून मोफत प्रवासाची जी सवलत आहे, ती बंद करायला हवी. त्यांच्याकडे वातानुकूलित गाड्या असतात आणि त्यांना महिन्याला एक लाखाच्या घरात मानधन मिळते. त्यामुळे त्यांना बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत कशाला हवी.
- योगेश पाटील, नागरिक
आमदारांनी स्वत:हूनच एसटीच्या मोफत प्रवासाची सुविधा नाकारावी, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती भरपूर चांगली असते. ते निवडणुकांच्या वेळी करोडो रुपये खर्च करतात. त्यामुळे ते लोकप्रतिनिधी असले तरी, जनतेने निवडून दिल्यामुळे ते आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांची मोफत प्रवासाची सुविधा कायमची बंद करायला हवी.
- शैलेंद्र सपकाळे, नागरिक