महामार्गावरील अपघातात भाई जगताप बचावले
By admin | Published: January 20, 2017 12:38 AM2017-01-20T00:38:21+5:302017-01-20T00:38:21+5:30
चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सुखरूप : गुजराल पेट्रोलपंपनजीक भरधाव दुचाकी आदळली चारचाकीवर
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून कॉँग्रेस नेते आमदार भाई जगताप गुरुवारी सायंकाळी अपघातातून बालंबाल बचावले. जळगावातून धुळ्याकडे ते चारचाकीने जात असताना समोरुन भरधाव वेगाने रिक्षाला ओव्हरटेक करणारी दुचाकी आदळल्याने त्यांची चारचाकी महामार्गाच्याकडेला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत नियंत्रण मिळविल्याने वाहन उलटले नाही. त्यामुळे जगताप हे बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली असून दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपानजीक गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता झाला.
जगताप यांच्या गुडघ्याला बसला मुका मार
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी भाई जगताप गुरुवारी जळगावात आले होते. त्या आटोपून संध्याकाळी ते चारचाकीने ते धुळ्याकडे निघाले. सहा वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन गुजराल पेट्रोल पंपासमोर भरणा:या पिंप्राळा बाजाराजवळ आले असता समोरुन भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट चारचाकीवर आदळल्याने ती महामार्गाच्या कडेला घसरली. सुदैवाने ती पलटी झाली नाही. अन्यथा अनर्थ झाला असता. या अपघातात जगताप यांच्या गुडघ्याला मुका मार बसला आहे.
या अपघाघामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. कॉँग्रेसच्या नेत्यांचा अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमी तरुणांना सावरत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. परंतु, जगताप यांनी या तरुणांना वाहन हळू चालविण्याची समज देवून सोडून देण्याचे सांगितल्याने या तरुणांवर कारवाई झाली नाही. ते दोघे तरुणही अपघातातून बचावले.
समोरुन येणारी दुचाकी थेट कारवर आदळली. सुदैवाने मी बचावलो. दुचाकीस्वारांना समज देण्याबाबत पोलिसांना सांगितले.
-भाई जगताप, कॉँग्रेस नेते