भुसावळ येथे तरुणीची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 04:01 PM2019-04-15T16:01:17+5:302019-04-15T16:02:20+5:30
एकतर्फी प्रेमातून घडलेला प्रकार, तरुणास अटक
भुसावळ : येथील जळगाव रोडवरील लोणारी मंगल कार्यालयाजवळ हुडको कॉलनी येथे एका तरुणीवर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊला घडली. प्रीती ओंकार बागल (२२) असे या तरुणीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.
शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची धामधूम सुरू असताना प्रीती ओंकार बागल (२२) ही तरुणी तिच्या बहिणीसोबत अभिवादन करून घरी परत आली. त्यानंतर त्या हातपंपावर पाणी भरत असताना संशयित आरोपी सागर इंगळे हा तरुण त्या ठिकाणी आला. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझी बदनामी करेल, असा दम देऊ लागला. यानंतर त्याने खिशातून चाकू काढून सरळ तिच्या पोटात खुपसला. यावेळी तरुणी जमिनीवर कोसळली. त्याने त्या मुलीच्या कमरेवर पाय ठेवून चाकू काढून दुसरा वार केला. तरूणी जखमी अवस्थेत सैरावैरा पळू लागली. ती समोरच्या घरात घुसली व गतप्राण झाली. संशयित आरोपी इंगळे हा वार केल्यानंतरही घटनास्थळी रिक्षाच्या आडोशाला उभा होता. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी त्याला ताब्यात घेतले.
प्रीतीचे वडील मयत झाले असून, आई व सहा बहिणींसह ती राहत होती. प्रीतीने आयटीआयपर्यंत शिक्षण घेतले होते. नुकताच तिने रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, एकाच दिवशी दोन महिलांचे खून झाल्याने कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी दिल्या. हे आरोपीला ताब्यात घेतले असून प्रीतीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पालिकेच्या दवाखान्यात प्रतीक्षेत आहे.
तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ
संशयित आरोपी इंगळे याचा गेल्या काही दिवसांपासून मयत प्रीतीला खूप त्रास होता. या त्रासाला कंटाळून त्या मुलीसह त्यांच्या बहिणीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना थातूरमातूर कारण सांगून जीवाची भीती दाखवून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप मयत मुलीच्या बहिणींनी केला आहे. तक्रारीची दखल घेतली असती, तर हा खून झाला नसता, असे प्रीतीच्या बहिणी टाहो फोडून बोलत होत्या.