जुन्या वादातून तरुणाचा निर्घूण खून, दोन जण जखमी
By विजय.सैतवाल | Published: December 10, 2023 10:04 PM2023-12-10T22:04:23+5:302023-12-10T22:05:11+5:30
समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली.
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गेल्या काही वर्षांपासून असलेले आपसातील वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाला बोलवून त्याच्यावर चॉपरने सपासप वार करत त्याचा निर्घूण खून करण्यात आला. या वेळी त्याच्या सोबत असलेल्या आशीष संजय सोनवणे व भावाला वाचविण्यासाठी गेलेला गोकूळ बळीराम सोनवणे यांच्यावरही वार करण्यात आल्याने हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली.
समतानगर परिसरात जुन्या वादातून रविवारी सकाळी अरुण व काही तरुणांमध्ये पुन्हा वाद उद्धभवला होता. त्यावेळी हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता. परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने वाद झालेल्या तरुणांनी अरुण सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे बोलवले. अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हादेखील तिथे धावत गेला. तोवर मारेकऱ्यांनी अरुणवर चॉपरने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले तर सोबत असलेला आशीष संजय सोनवणे याच्यावरही वार करण्यात आले. भावावर होत असलेले वार रोखण्यासाठी गेल्याने गोकुळ बळीराम सोनवणे याच्याही हातावर जखमा झाल्या. घटनेनंतर तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले.