बीएसएनएलची सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:52+5:302021-06-20T04:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव : येथील बीएसएनएल सेवा गेल्या आठवडाभरापासून विस्कळीत झाली आहे. बँक कामकाज व लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथील बीएसएनएल सेवा गेल्या आठवडाभरापासून विस्कळीत झाली आहे. बँक कामकाज व लसीकरण माहिती अपडेट करायलाही अडचण येत आहेत.
बीएसएनएलची इंटरनेट सेवा महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, जिल्हा बँक, युनियन बँक यांना जोडलेली आहे. ती आठवडाभरापासून दोन दिवस सुरू, तर एक दिवस बंद अशा पद्धतीने सुरू आहे.
बँकेतील कर्मचाऱ्यांनी बीएसएनएल कार्यालयात अधिकाऱ्यांशी बोलूनदेखील इंटरनेट सेवा विस्कळीतच आहे. बँकेबरोबरच ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.
बँकेतून पैसे काढतानाही ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बीएसएनएल मोबाईलदेखील टॉवर नसल्याने अनेक मोबाईल संच ठप्प झाल्याचे चित्र आहे.
येथे बीएसएनएल ऑफिसमध्ये एकही कर्मचारी नाही. ग्राहकांनी तक्रार करायची तर कुठे करायची, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य विभागालादेखील इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याचा फटका बसलेला दिसून येतो. माहिती आरोग्य खात्याकडे ऑनलाईन पद्धतीने पाठविणे हेदेखील इंटरनेटमुळे ठप्प झालेले दिसून येते.
गेले दोन दिवसांपासून धरणगाव शहरातील बँक तांत्रिक कारणांमुळे बंद अशा पद्धतीने फलक लावलेले आहेत. या ठिकाणी आम्हा ग्राहकांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
- गोपाळ पाटील, ग्राहक, धरणगाव
लसीकरण केंद्रावरदेखील आम्हाला माहिती अपडेट करायला अडचणी येत आहेत. इंटरनेट सेवेअभावी माहिती अपलोड करता येत नाही. यामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठांना माहिती देता येत नाही. लवकरात लवकर इंटरनेट सेवा सुरू करावी.
- अनिल बडगुजर, डाटा ऑपरेटर, आरोग्य विभाग
तांत्रिक अडचणीमुळे बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली असून, मोबाईल टॉवर सुरू करण्यात आलेले आहेत. ही अडचण जळगाव येथून आहे. लवकरच ही संपूर्ण सेवा सुरू करण्यात येईल.
- योगेश कासार, कनिष्ठ उपअभियंता, बीएसएनएल, धरणगाव-एरंडोल