Budget 21 : अर्थसंकल्प सादर होताच चांदीत एक हजाराची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:51 AM2021-02-05T05:51:07+5:302021-02-05T05:51:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार होताना दिसून आला व एकाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार होताना दिसून आला व एकाच दिवसात तीन वेळा सोने-चांदीचे भाव बदलले. यात अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच भाववाढ झाली, तर अर्थसंकल्पादरम्यान आयात शुल्क कमी केल्याची घोषणा झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी झाले. दिवसभरातील या चढ-उतारानंतर चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर तर सोने ४९ हजार ९०० रुपयांवर स्थिरावले.
गेल्या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी होण्यासह प्राप्तीकर (इन्कम टॅक्स) कमी होण्याची अपेक्षा होती, मात्र तसे काहीही न झाल्याने सुवर्ण बाजारावरील भार कायम राहिला होता, तसेच सुवर्ण व्यवसायाबाबत काहीही घोषणा नसल्याने निराशा झाली होती. तसेच दोन वर्षांपूर्वी आयात शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षांपासून सुवर्ण व्यावसायिकांच्या पदरी निराशाच पडत होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचा व्यावसायिकांसह ग्राहकांनाही लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२०२० या वर्षात कोरोनामुळे असलेल्या लाॅकडाऊनच्या दरम्यान सुवर्ण बाजार बंद राहिला तरी सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर आता अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी केल्याने त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी जाणवू लागला आहे.
घोषणेनंतर घसरण
यंदाच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी तर सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार दिसून आला. सकाळी सुवर्ण बाजार उघडताच चांदी ७४ हजार रुपये तर सोने ५०० हजारावर होते. अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन चांदी ७५ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. तसेच सकाळी सोने ५० हजारावर असताना अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली व त्यात ४०० रुपयांनी वाढ होऊन ते ५०० हजार ४०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर मात्र सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा झाली, त्यानंतर मात्र हे भाव पुन्हा कमी झाले. याच चांदीत एक हजाराने घसरण होऊन ती ७४ हजार रुपये प्रति किलोवर तर सोन्यात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ४९ हजार ९०० रुपयांवर स्थिरावले. एकूणच एकाच दिवसात सोने-चांदीच्या भावात तीन वेळा बदल झाल्याचे यंदा दिसून आले.