जळगाव मनपाच्या १०० कोटींच्या कामासाठी अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:45 AM2018-09-11T11:45:06+5:302018-09-11T11:52:51+5:30

१० मनपा अभियंते लागले कामाला

Budget for Jalgaon Municipal Corporation's 100 Crore | जळगाव मनपाच्या १०० कोटींच्या कामासाठी अंदाजपत्रक

जळगाव मनपाच्या १०० कोटींच्या कामासाठी अंदाजपत्रक

Next
ठळक मुद्देपहिल्या महासभेत मिळणार मंजुरीप्रस्ताव तयार करण्याचे आदेश

जळगाव : १०० कोटींच्या विकास निधीचे प्रभाग निहाय अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून गतीने सुरू असून शहरातील कोणताही भाग सुटू नये अशी कामे हाती घेण्याच्या बांधकाम विभागास सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी १० अभियंत्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
२०१५ मध्ये महापालिकेस २५ कोटींचा विकास निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. तो निधी २०१७ मध्ये मिळाला. मात्र कामांच्या प्रस्तावांवरून अनेक वाद या निधीच्या कामात निर्माण झाले. अद्यापही या कामांचा मार्ग मोकळा झालेला नाही.
मनपात भाजपाची नुकतीच सत्ता आली. त्यानंतर काही नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यास गेले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे हे या नगरसेवकांबरोबर होते.
त्यांच्याच प्रयत्नाने मुख्यमंत्र्यांनी शहरातील विकास कामांसाठी १०० कोटींचा निधी देण्याचे जाहीर करून दोन महिन्यात हा निधी विकास कामांवर खर्च केल्यास आणखी पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. तत्पूर्वी गेल्या महिन्यात मंजूर १०० कोटींच्या निधीबाबत मनपा प्रशासनाकडे पत्र प्राप्त झाले होते.
प्रस्ताव तयार करण्याचे आदेश
शासनाकडून महापालिकेस १०० कोटी मंजूर करण्यात आल्या बाबतचे पत्र प्राप्त झाल्याने प्रशासनाकडून शहरातील विविध भागातील कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या कामांना गती मिळाली आहे.
मनपा बांधकाम विभागातील १० अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांना विविध कामे प्रस्तावित करून त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पहिल्या सभेत येणार प्रस्ताव
महापालिका महापौर निवडीसाठी येत्या १८ सप्टेंबर रोजी निर्वाचित सदस्यांची विशेष सभा होणार आहे. महापौर निवडीनंतर आठवडाभरात महासभा किंवा विशेष सभा बोलावून १०० कोटींच्या कामांचे प्रस्ताव महासभेत सादर होतील. महासभेची मंजूरी मिळाल्यावर एकत्रित कामाचा विकास आराखडा (डीपीआर) हा शासनाला सादर होईल, असे सूत्रांनी सांगितले.
शासनाकडे जाणार प्रस्ताव
महासभेची मंजूरी मिळाल्यावर हा विकास आराखडा शासनाच्या नगरपालिका प्रशासन विभागाकडे सादर केला जाणार आहे. दरवेळी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत सादर होतो.
यावेळी मात्र तो एक टप्पा वगळून शासनाकडे रवाना होईल, असे सूत्रांनी सांगितले. या महिनाअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासनाकडून पत्र मिळाल्यानंतर बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महासभेत हे प्रस्ताव एकत्रित सादर केले जातील.
-चंद्रकांत डांगे, आयुक्त, मनपा

Web Title: Budget for Jalgaon Municipal Corporation's 100 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव