लोकसहभागातून उभे राहिलेले भुसावळचे जेतवन बुद्धविहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:47 PM2019-05-07T15:47:01+5:302019-05-07T15:48:22+5:30
भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागात सम्राट अशोक नगरात लोकसहभागातून जेतवन बुद्धविहार उभे राहिले आहे.
हबीब चव्हाण
भुसावळ, जि.जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागात सम्राट अशोक नगरात लोकसहभागातून जेतवन बुद्धविहार उभे राहिले आहे. ग्रामस्थांनी बैठक घेऊन तापीनदी पात्रातून वीट भट्टीवरून विटा आणल्या आणि श्री गणेशा केला.
कंडारी प्लॉटस येथे बुद्ध विहाराची संकल्पना येथील रहिवासी सुमंगल रवींद्र अहिरे, फकिरा हुसले, भिका बागुल, भगवान देवरे, वार्ड अध्यक्ष पांडुरंग लोखंडे यांनी मांडली. त्यांनी विचार केला की आपल्या गावात चांगले व मोठे बुद्धविहार बांधले पाहिजे यासाठी कंडारी प्लॉटस येथे बैठक घेण्यात आली. फकिरा पहेलवान यांच्या आखाड्याच्या काही तरुणांनीदेखील ह्या कामात सहभाग घेतला. पांडुरंग लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
शिंगारे यांच्या घरासमोर फार मोठे पटांगण होते. त्या ठिकाणी सहा हजार ६० चौरस फूट जागा मोजून एकाच रात्रीच गावातील मुलांनी तापी नदीजवळील वीटभट्ट्यांवर जावून विटा जमा केल्या. मध्यरात्री एक चबुतरा बाळूू मिस्त्री, लहानू गरुड, गौतम मिस्त्री यांनी बांधला. त्या चबुतऱ्यावर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते १९८७ मध्ये बुद्धविहाराची पायाभरणी करून लहान मूर्ती स्थापन करण्यात आली.
या वेळी उपस्थित पांडुरंग लोखंडे, रवींद्र अहिरे, फकिरा पहेलवान, सुरेश लोखंडे, कैलास ढिवरे, विश्वनाथ पंडित गायक, प्रभाकर देवरे व गावातील नागरिक उपस्थित होते. यानंतर बुद्धविहाराच्या बांधकामासाठी गावातील लोकांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अध्यक्ष भिका बागुल, उपाध्यक्ष म्हसाजी वाघमारे, सोनवणे बाबूजी, सकाभाऊ निकम यांनी गावामधून व भुसावळसह परिसरातून विहार बांधण्यासाठी धम्म दान गोळा करण्यास सुरुवात केली. देणगी गोळा झाल्यानंतर विहार बांधायला सुरुवात झाली.
नंतर महेंद्र यशोदे यांनी विहाराचे काम हाती घेतले. देणग्या कमी पडल्यावर काही वर्षे काम बंद करण्यात आले. मग १४ एप्रिल २००१ रोजी बैठक घेण्यात आली. त्यात बुद्धविहाराचे काम कसे होईल यासाठी राजेश आव्हाड, संभाजी सोनवणे, विजय बाºहे यांनी पूर्ण विहार हातात घेऊन तीन महिन्यांत काही प्रमाणात देणग्या गोळा करून पुन्हा विहाराच्या कामाला सुरवात केली.
काही प्रमाणात काम पूर्ण झाल्यावर त्या विहाराचे नाव ‘जेतवन बुद्धविहार’ असे ठेवावे असे रवींद्र अहिरे यांनी सुचवले व विहारात सुरेश गायकवाड रा.पारस, जि.अकोला यांनी त्या वेळेस त्यांच्या कामगार कल्याण निधीतून ३५ हजार किमतीची बुद्ध मूर्ती भेट म्हणून दिली. यानंतर बुद्ध पौर्णिमेला २५ मे २००२ दिवशी मूर्तीची स्थापना करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढून मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते विहारात मूर्ती बसवून विहारचे उद्घाटन करण्यात आले. त्या दिवसापासून तर आजपर्यंत विहारात समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येतात. दर रविवारी बुद्धवंदना घेण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून विहाराची देखभाल आनंद पुंडलिक खेडकर हे करतात.
जेतवन बुद्धविहार येथील पंचधातूची बुद्ध मूर्ती ही बुद्ध (गया) बिहार येथून आणण्यात आली होती. बुद्धविहारात दर वर्षी तीन महिने वर्षावास कार्यक्रम घेतला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले व इतर महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम घेतले जातात.