जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘ऑक्सिजन’चा बफर स्टॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 04:48 PM2017-08-13T16:48:55+5:302017-08-13T16:50:00+5:30
उत्तर प्रदेशातील घटनेच्या पाश्र्वभूमीवर दक्षता : दररोज लागतात 20 ते 25 सिलिंडर
ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल
जळगाव, दि. 13 - ऑक्सिजनचा ऐनवेळी तुटवडा भासून रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू नये म्हणून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरेशा साठय़ासह ‘बफर स्टॉक’ करून ठेवला जात आहे. सर्व कक्ष मिळून येथे दररोज 20 ते 25 सिलिंडर तर महिन्याला सुमारे 600 ते 700 सिलिंडरची आवश्यकता भासते, अशी माहिती जिल्हा रूग्णालयाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ ला दिली.
उत्तरप्रदेशात ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठय़ा अभावी जवळपास 63 बालकांना जीव गमवावा लागला. या पाश्र्वभूमीवर संपूर्ण जळगाव जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला असता येथे सिलिंडर पुरेसे असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी रुग्णालयाच्यावतीने निविदा प्रक्रिया राबवून ठेका देण्यात आलेला आहे. वर्षभरासाठी हा ठेका असून दरवर्षी यासाठी निविदा काढल्या जातात. त्यानुसार संबंधित ठेकेदार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करतो.
जळगावातच प्रकल्प
जिल्हा रुग्णालयाला पुरविण्यात येणारे ऑक्सिजन सिलिंडर हे जळगावातीलच प्रकल्पातून पुरविले जातात. सुरुवातीपासून रुग्णालयात कधी तुटवडा भासला नसल्याचे सांगण्यात आले.
महिन्याला 600 ते 700 सिलिंडरची आवश्यकता
जिल्हा रुग्णालयात दररोज 20 ते 25 ऑक्सिजन सिलिंडर आवश्यकता भासते. यामध्ये आपत्कालीन कक्षात सरासरी 10 व इतर कक्षात 10 ते 15 ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासते. यात नवजात बालक कक्षातही पुरेसा साठा उपलब्ध ठेवला जातो, असे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. दर महिन्याला येथे 600 ते 700 सिलिंडर लागतात. त्यात कधी मोठे अपघात अथवा काही गंभीर घटना घडल्यास सिलिंडरची ही संख्या वाढते.
मनपा रुग्णालयातही स्थिती सामान्य
जळगाव शहरातील महनगरपालिकेच्या रुग्णालयातही ऑक्सिजनची स्थिती सामान्य असल्याचे सांगण्यात आले. या रुग्णालयांमध्ये जिल्हा रुग्णालयासारखे जास्त ऑक्सिजनची गरज पडत नसल्याने सिलिंडर संपले की ते भरून आणले जाते.
जिल्हा रुग्णालयात आवश्यक तेवढा ऑक्सिजन सिलिंडरचा साठा असतो. सोबतच आपत्कालीन प्रसंगासाठी बफर स्टॉक करून ठेवलेला असतो. कधी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत नाही व सध्याही पुरेसा साठा आहे.
- डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.
मनपा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असतात. तुटवडा भासत नाही. सध्याही सिलिंडर आहे.
- डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा रुग्णालय