साहित्य, कला क्षेत्रात योगदान देणारी पिढी घडावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:51 PM2018-08-10T17:51:51+5:302018-08-10T17:52:39+5:30
अशोक सोनवणे : चोपडा येथे ‘मसाप’च्या सभेस साहित्यिकांची उपस्थिती लक्षणीय
चोपडा, जि.जळगाव : चोपडा तालुक्याला साहित्य व सांस्कृतिक अभिरूचीची मोठी परंपरा आहे. या परंपरेचा वारसा भविष्यातही चालावा. कसदार साहित्य निर्माण करण्यासाठी तेवढ्याच ताकदीची पिढी सातत्याने घडत रहावी, असा विचार कायम घोळत असताना वारंवार मराठी साहित्य परिषदेशी संपर्क आला. त्यामुळे मसाप संस्थेच्या माध्यमातून चोपडा तालुक्यात साहित्य, कला क्षेत्रात अधिकाधिक योगदान देणारी पिढी घडवावी म्हणून या मैलाचा दगड असणाऱ्या संस्थेच्या शाखेची मुहूर्तमेढ रोवत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व मसाप शाखेचे नियोजित अध्यक्ष अशोक नीळकंठ सोनवणे यांनी केले.
शहरातील विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात मसापच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन कवी सोनवणे बोलत होते. या वेळी मंचावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनश्याम अग्रवाल, कार्यवाह श्रीकांत नेवे, डॉ.विकास हरताळकर, शाखेच्या कार्यकारणीतील उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रमुख कार्यवाह संजय बारी, कार्यवाह गौरव महाले, कोषाध्यक्ष योगेश चौधरी आदी उपस्थित होते.
@१७ रोजी पार पडत असलेला मराठी साहित्य परिषदेचा उद्घाटन सोहळा सर्व सभासदांनी घरचे मंगलकार्य समजून उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनश्याम अग्रवाल यांनी केले.
या सर्वसाधारण सभेत प्रास्ताविक कार्यवाह संजय बारी यांनी केले. या वेळी योगेश चौधरी, रमेश पाटील, संजीव शेटे, प्रभाकर महाजन, पंकज शिंदे, रमेश शिंदे, जयश्री चव्हाण आदींनी चर्चेत सहभाग घेतला. गौरव महाले यांनी आभार मानले. यावेळी मसापचे सभासद उपस्थित होते.
‘खिडकी बाहेरचे जग’चे प्रकाशन
मसापच्या चोपडा शाखेचे उद्घाटन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या हस्ते व कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तसेच कविवर्य अशोक सोनवणे यांचा बारावा काव्यसंग्रह ‘खिडकी बाहेरचे जग’चे प्रकाशनदेखील या सोहळ्यात होणार आहे. याप्रसंगी मसाप कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप, कार्यवाह प्रा.वि.दा.पिंगळे, चित्रकार धनंजय गोवर्धने, तहसीलदार व साहित्यिक आबा महाजन हे मान्यवर उपस्थित राहतील.