सैनिकांच्या मुलांसाठी शाळा बांधणार
By admin | Published: January 7, 2017 12:35 AM2017-01-07T00:35:58+5:302017-01-07T00:35:58+5:30
अभिनेता मकरंद अनासपुरे : चोपडय़ात दर्पण पुरस्काराचे वितरण
चोपडा : देशातील सैनिकांच्या त्यागाचे मोल आपल्याला नाकारता येणार नाही. ते आहेत म्हणून आपण आरामात जगतोय. ‘नाम’च्या माध्यमातून आपण सैनिकांच्या मुलांसाठी शाळा बांधणार आहोत, असे चित्रपट अभिनेते व ‘नाम’ संस्थेचे प्रमुख मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चोपडय़ातील प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे दर्पण पुरस्काराचे वितरण मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
आनंदराज पॅलेसशेजारी असलेल्या लॉन्सवर हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास पाटील होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुरेश पाटील, जगदीश वळवी, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, नगरसेवक जीवन चौधरी, चंद्रहास गुजराथी, डॉ. निर्मल टाटिया, अॅड. घनश्याम पाटील आदी होते.
अहिराणी भाषा खूप गोड आहे. बहिणाबाईंची गाणी अप्रतिम आहेत. सध्या समाजात संवेदनशीलता खूप कमी होत चालली आहे. एकत्र राहणे गरजेचे आहे, म्हणजे संवाद साधता येतो. कोणाशी काहीही बोलायचे नाही अशी प्रवृती वाढत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कैलास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक फाउंडेशन अध्यक्ष श्याम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन संजय बारी आणि पौर्णिमा हुंडीवाले यांनी केले. सचिव लतीश जैन, हिरेंद्र जैन, अजय पालीवाल, विश्वास वाडे, महेश पाटील आदी हजर होते.(वार्ताहर)