जळगावात पोलीस ठाण्यासमोरच बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:39 PM2020-02-19T12:39:37+5:302020-02-19T12:40:15+5:30
स्वत:च्या बांधकाम साईडवरच घेतला गळफास
जळगाव : खोटे नगरमधील तालुका पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या साई सृष्टी या नवीन बांधकाम इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात इमारतीचे मालक, बांधकाम व्यावसायिक अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (५४, रा.अष्टभुजा नगर, पिंप्राळा, मुळ रा.वढोदा, ता.चोपडा) यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता उघडकीस आली. पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
अनिल सूर्यवंशी यांचे जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांच्या ‘साई सृष्टी’ या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. मंगळवारी सकाळी ते बांधकामाच्या ठिकाणी गेले. दुपारी १२ वाजेपर्यंत नातेवाईकांच्या संपर्कात होते. त्यानंतर पत्नी वैशाली यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने वैशाली यांनी त्यांच्याशी संपर्क केला, पण तेव्हाही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
डॉक्टर मुलाने घेतली धाव
ाूर्यवंशी यांचा मुलगा डॉ. कृणाल शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकिय अधिकारी आहे. मंगळवारी डॉ. कृणाल रुग्णालयात असताना आईने तुझ्या वडिलांना दोन वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तू बांधकामाच्या साईडवर जावून बघ म्हणून मुलाला सांगितले. त्यामुळे त्यांनी तात्काळ साईडवर धाव घेतली असता तेथे वडीलांनी तळमजल्याच्या गाळ्यात दोरीने गळफास घेतल्याचे उघड झाले. सर्वात आधी हा प्रकार शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आला, त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. नातेवाईकांना कळविण्याची तयारी सुरु असतानाच मुलगा डॉ.कृणाल तेथे पोहचले होते. दरम्यान, हवालदार ईश्वर लोखंडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
रुग्णालयात प्रचंड गर्दी
सूर्यवंशी यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पूत्र तथा जि. प.सदस्य प्रताप पाटील, गोपाळ फकिरचंद पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक दाखल झाले होते.
बांधकाम व्यवसायात कोट्यवधीचा फटका
एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार द्वारका नगरात त्यांनी ४ ते ५ इमारतीचे बांधकाम केलेले आहे. त्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे, मात्र त्यात एकही फ्लॅट बुकींग किंवा विक्री झालेला नाही. व्यवसायात मोठी गुंतवणूक झाली, बॅँकाचेही कर्ज मोठे आहे, त्यात घर विक्रीला प्रतिसाद नाही, त्यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तविण्यात आली.
मोबाईल, कुटुंब आणि सीडीआरमध्येच कळणार कारण
अनिल सूर्यवंशी यांच्या खिशात चिठ्ठी असल्याचे सांगितले जात होते, मात्र पोलीस व नातेवाईकांनी त्यास दुजोरा दिला नाही व कारणही कोणी सांगू शकले नाही. कुटुंबातील सदस्य, मोबाईल व कॉल सीडीआर यातूनच आत्महत्येचे कारण उघड होऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह वढोदा, ता.चोपडा या मूळ गावी नेण्यात आला.