पाचोऱ्यातील अतिक्रमणांवर बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:36+5:302021-06-05T04:12:36+5:30

शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासून पाचोरा शहरातील अतिक्रमित असलेल्या दुकानांवर, दुकानांच्या बाहेर असलेल्या शेडवर आणि रस्त्यावर नेहमीच वाहतुकीला अडथळा करणाऱ्या ...

Bulldozers on Pachora encroachments | पाचोऱ्यातील अतिक्रमणांवर बुलडोझर

पाचोऱ्यातील अतिक्रमणांवर बुलडोझर

Next

शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासून पाचोरा शहरातील अतिक्रमित असलेल्या दुकानांवर, दुकानांच्या बाहेर असलेल्या शेडवर आणि रस्त्यावर नेहमीच वाहतुकीला अडथळा करणाऱ्या भाजीपाला तसेच फळ विक्रेत्यांच्या दुकानांवर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वात आणि पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भुयारी मार्ग, रेल्वे स्टेशन रोड तसेच जामनेर रोडवर असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत लहान-मोठ्या सुमारे ५० टपऱ्या आणि दुकाने हटविण्यात आली. त्याचबरोबर पाचोरा शहरातील या महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या फळ विक्रेत्या हातगाड्यांना रस्त्यावरून हटवण्यात आले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी असलेल्या रस्त्यावर त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे हे रस्ते पूर्णपणे मोकळे झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

कोरोना आणि अपघाताचे माहेरघर बनले होते रस्ते

रस्त्यावरची वाहतूक कोंडी ही पाचोरा शहरातील एक मुख्य समस्या बनलेली असताना 'लोकमतने' अनेकदा या समस्येची बातमी प्रसिद्ध केलेली होती. पाचोरा शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोड आणि जामनेर रोडवर अनेक हॉटेल मोबाइल जनरल स्टोअर्स मेडिकल स्टोअर्स कापड दुकाने इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स आणि किराणा दुकानेदेखील असल्यामुळे या रस्त्यांवर नेहमीच प्रचंड गर्दी बघावयास मिळते, त्याच सोबत दररोज या रस्त्यावर शंभरापेक्षा जास्त फळ विक्रेत्यांच्या गाड्या उभ्या असल्यामुळे या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी उसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी पोलीस प्रशासन यासाठी नेहमीच डोकेदुखी ठरत आलेली होती. १ जूनपर्यंत कोरोना काळात ११ वाजेपर्यंत आणि त्यानंतर आता दोन वाजेपर्यंत दुकाने उघडे असल्यामुळे खरेदी करण्यासाठी जिवाची आणि कोरोना संसर्गाची पर्वा न करता लोकांची एकच झुंबड या रस्त्याने रोज बघायला मिळत होती आणि पाचोरा शहरातील कोरोना संसर्ग वाढण्याची भीतीदेखील या गर्दीमुळे निर्माण होत होती.

----

पाचोरा शहरातील अतिक्रमित दुकानांवर तसेच अनिर्बंध असलेल्या फळविक्रेते आणि भाजीविक्रेत्या हातगाड्यांवर ही कारवाई अखंड सुरू राहणार असून शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या अतिक्रमित दुकानांवर ही कारवाई अखंड सुरू राहणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या पथकाने केली कारवाई

मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वात प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, मधुकर सूर्यवंशी,दत्तात्रय जाधव, हेमंत क्षीरसागर, साईदास जाधव, हिमांश जयस्वाल, प्रकाश पवार, श्याम ढवळे, श्यामकांत अहिरे, शरद घोडके, चंद्रकांत चौधरी, विजय बाविस्कर, अनिल पाटील, विलास देवकर, पांडुरंग धनगर,भागवत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

तर पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील,पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे,पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील, सुनील पाटील, नंदकुमार जगताप, विजयसिंग पाटील यांचेसह पोलीस पथकाने चोख बंदोबस्त बजावला.

-----

पाचोरा शहरातील सर्वात मध्यवर्ती ठिकाण असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक, भुयारी मार्ग आणि जामनेर रोड रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या लहान मोठ्या अतिक्रमित टपऱ्या, दुकानांच्या बाहेर आलेले अतिक्रमित शेड तसेच फळे आणि पालेभाज्या यांच्या गाड्यांवर कारवाई करत नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन बुलडोझरच्या साह्याने टपऱ्या हटवल्यामुळे पाचोरा शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

----शोभा बाविस्कर

मुख्याधिकारी पाचोरा (फोटो - ०५सीडीजे ७)

Web Title: Bulldozers on Pachora encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.