‘बुलेट राजाला’ व्हिण्टेज कार, ब्रिटीशकालिन बंदुकीची मोहिनी
By Admin | Published: April 18, 2017 04:25 PM2017-04-18T16:25:43+5:302017-04-18T16:25:43+5:30
छंद म्हणून संकलित केलेल्या वस्तुंद्वारे जळगावातील बांधकाम व्यावसायिक सत्यजित पाटील यांना मात्र स्वतंत्र वलय प्राप्त होत आहे.
ऑनलाईन विशेष
जळगाव, दि. 18- रोजची धावपळ आणि जीवघेणी स्पर्धा यातून काही काळ विरंगुळा मिळविण्यासाठी अनेकजण छंद जोपासत असतात. छंद म्हणून संकलित केलेल्या वस्तुंद्वारे जळगावातील बांधकाम व्यावसायिक सत्यजित पाटील यांना मात्र स्वतंत्र वलय प्राप्त होत आहे.
मुळचे भडगाव तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी असलेले सत्यजित पाटील यांचा निधी रिअल इस्टेट नावाने व्यवसाय आहे. व्यवसायची जबाबदारी सांभाळत असताना ते पुरातन व दुर्मीळ वस्तुंचा संग्रह करण्याचा छंद जोपासत आहे.
व्हिण्टेज कारद्वारे शाही प्रवास
सत्यजित पाटील यांनी दोन वर्षापूर्वी 1942 चे मॉडेल असलेल्या व्हिण्टेज कारची खरेदी केली. या मॉडेलच्या जगभरात केवळ 150 कार रस्त्यावर आहेत. या कारची मालकी असलेल्या नागरिकांचा जागतिकस्तरावर मॉरिश मायनर क्लब कार्यरत आहे. हैद्राबादच्या नवाब कुटुंबाकडे असलेली ही कार पाटील यांच्या औरंगाबाद येथील मित्राने खरेदी केली होती. ही कार पाहिल्याबरोबर पाटील यांनी मित्राकडे ही कार खरेदी करण्यासाठी आग्रह धरला होता.
इंदौरवरून बफिंग आणि प्लेटींग
व्हिण्टेज कारची खरेदी केल्यानंतर पाटील यांनी या कारचचे 65 स्पेअर पार्ट बदलवून घेतले. त्यासाठी दिल्ली येथील 110 वर्षापूर्वीच्या दुकानातून स्पेअर पार्टची खरेदी केली. दीड वर्षापूर्वी या कारची रंगरंगोटी करण्यात आली. मॉरिस मायनर म्हणून परिचित असलेल्या या कारला साईड वॉल इंजिन आहे.
कारला हॅन्डलची सुविधा
या कारला हॅन्डलच्या माध्यमातून सुरु करण्याची देखील सुविधा आहे. कारमध्ये प्रवेश करण्यासाठी समोरून दोन दरवाजे आहेत. कारच्या मागच्या बाजूला दरवाजा नाही. कारच्या समोर असलेली काच ही दोन भागात लावण्यात आली आहे. कारमध्ये आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण केल्यानंतर त्यातील प्रवास हा राजेशाही आणि लक्षवेधून घेणारा असल्याचे सत्यजित पाटील सांगतात.
व्हिण्टेज कारसोबत बुलेट राजा
व्हिण्टेज कारच्या खरेदीसोबतच पाटील यांनी 1962 चे मॉडेल असलेल्या बुलेटची खरेदी केली आहे. जळगाव वनविभागाने कारवाई दरम्यान ही बुलेट जप्त केली होती.5 वर्षापूर्वी झालेल्या लिलावात पाटील यांनी 45 हजार रुपयांमध्ये ही बुलेट विकत घेतली. या बुलेटच्या नूतणीकरणासाठी त्यांनी तब्बल एक लाख 25 हजारांचा खर्च केला.आकर्षक असलेल्या या बुलेटवर स्वार झाल्यानंतर ‘बुलेटराजा’चा फिल आपोआप येत असतो.
ब्रिटीशकालिन बंदूक अन् कार्यालयाला पुरातन लूक
सत्यजित पाटील यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे ब्रिटीशकालिन बंदूक देखील आहे. पुरातन वस्तूंच्या संग्रहाची आवड म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयाला देखील गड किल्ल्यांमधील वास्तूचा लुक दिला आहे. त्यात काळवीटच्या शिंगाचा लूक असलेले काष्ठशिल्प भिंतीवर लावलेले आहेत. कार्यालयाला लावलेला दरवाजा देखील 30 ते 35 वर्षापूर्वीचा आहे.