सराफ व्यवसाय भावात तेजी, व्यापारात मंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:55 PM2020-07-25T21:55:39+5:302020-07-25T21:56:37+5:30
कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीचे भाव गगनाला भिडल्यामुळे भावात तेजी, तर व्यापारात मंदीची स्थिती आहे.
वासेफ पटेल
भुसावळ : सराफ बाजारात बंगाली कारागीर गेल्यामुळे तसेच मार्च ते जून या कालखंडात लग्नसराई व इतर कार्यक्रम कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गेल्याने पूर्वीच्या तुलनेत फक्त २५ टक्के व्यवसाय होत आहे. मात्र कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीचे भाव गगनाला भिडल्यामुळे भावात तेजी, तर व्यापारात मंदीची स्थिती आहे.
९० टक्के कारागीर हे पश्चिम बंगालचे
२२ मार्चपासून कोरोना पाशर््वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर यानंतर याच कालखंडामध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शासनाने लग्नकार्य तसे इतर कार्यक्रमाची परवानगी दिल्यामुळे सर्वांनी आटोपशीर कार्यक्रम केले. या कार्यक्रमात लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद होती व अनेकांना याचा फटका बसला असल्यामुळे औपचारिकता व प्रथा म्हणूनच नेहमीच्या तुलनेत ज्वेलरीची खरेदी करण्यात आली. याशिवाय सराफ बाजारात जिल्ह्यात ९० टक्के कारागीर हे पश्चिम बंगाल येथून येतात. लॉकडाऊन असल्यामुळे हाताला काम नसल्याने ते आपल्या गावी बंगालला गेले. सध्या जरी अनलॉक असला तरी महाराष्ट्राची कोरोना परिस्थिती बघून कारागिरांना महाराष्ट्र पाठवण्याचा धडास त्यांचे कुटुंबीय करत नाही.
भुसावळात ५० दुकाने
दरम्यान, भुसावळात सराफ बाजारात ५०च्या जवळपास सराफ दुकाने आहेत. यांची मदार कमीत कमी शंभर कारागिरांवर असते. मात्र कारागीर उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक कारागीर व ज्या बंगाली कारागीरांचे कुटुंबीय येथे आहे त्यांच्या माध्यमातून अनलॉकमध्ये व्यवसाय सुरू आहे.
फक्त २५ टक्के उलाढाल
एकंदरीत, पूर्वीच्या तुलनेत फक्त २५ टक्के उलाढाल सराफ बाजारात दिसून येत आहे. तसेच देशात सोन्याची आयात कमी झाल्यामुळेही सोन्या-चांदीचे भाव वधारल्ताचे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
लोकांकडे पैसा नाही. अत्यावश्यक प्रथेनुसार काही सोन्या-चांदीचे दागदागिने द्यायचे असले तरच प्रथा रिवाज म्हणून लोक खरेदी करीत आहेत. कारागीरही बंगालवरून यायला तयार नाही. मंदीच्या सावटाने सराफ बाजार वेढले गेले आहे. लवकरच सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा आहे.
- दीपक अग्रवाल, विक्रेता व सदस्य, सराफ असोसिएशन, भुसावळ.