जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथे शॉक लागल्याने बैलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 05:10 PM2019-07-07T17:10:46+5:302019-07-07T17:21:17+5:30
विजेच्या शॉकने बैलाचा मृत्यू झाल्याची घटना लोंढ्री, ता.जामनेर येथे रविवारी दुपारी घडली. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, बैलगाडीत बसलेल्या पाच जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले.
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : विजेच्या शॉकने बैलाचा मृत्यू झाल्याची घटना लोंढ्री, ता.जामनेर येथे रविवारी दुपारी घडली. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, बैलगाडीत बसलेल्या पाच जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले.
सूत्रांनुसार, ईश्वर बाबूराव चौधरी हे बैलगाडी घेऊन घराकडे निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी छाया ईश्वर चौधरी, संगीता राजू सावकारे, राजू सावकारे व मजूर सोपान जगन चव्हाण असे चार जण होते. लोंढ्री गावाजवळील सहा नंबर ट्रान्सफार्मरच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असताना याची कल्पना चौधरी यांना आली नाही. बैलगाडी ट्रान्सफार्मरच्या परिसरातून जात होती. तेव्हा तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने बैलाला खेचले. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा बैल जखमी झाला. महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील अनिल राजाराम चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन महिलांना वाचविले तर ईश्वर चौधरी, राजू सावकारे व सोपान जगन चव्हाण यांनी उड्या मारून आपले प्राण वाचविले.
रविवारी दुपारी पाऊस सुरू असताना ही घटना घडलीे. घटनेची माहिती मिळताच लोंढ्रीतील गावकऱ्यांनी घटनास्थळी जावून मदत केली आहे. लाईनमन भूषण खडके व नीलेश बोरसे यांना भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करून विद्युतप्रवाह बंद करण्यासाठी सूचना केली. तब्बल अर्ध्या तासाने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.
घटनास्थळी कमलाकर पाटील, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे व गोपाल पाटील यांनी पाहणी केली आहे.
दोन महिन्यांपासून शेतकºयांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
या ट्रान्सफार्मरच्या परिसरातील विद्युत तारांमध्ये नेहमी विद्युत प्रवाह दोन महिन्यांपासून सुरू आहे. याची तक्रार अनिल राजाराम चौधरी या शेतकºयाने लाईनमन भूषण खडके व नीलेश बोरसे यांच्याकडे केली आहे. पण या तक्रारीकडे यांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली, असा आरोप अनिल चौधरी यांनी केला आहे. नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.