बैलांच्या शर्यतीने साकेगावात दोन ठिकाणी पोळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:21 PM2018-09-09T18:21:05+5:302018-09-09T18:22:36+5:30
मागील पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे बैलांची शर्यत लावून दोन ठिकाणी पोळा फोडण्यात आला. मागील वर्षी पोळ्या सणाला गालबोट लागले होते त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा गावात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.
पोळा होण्याआधी ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफ वाजवून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर खालच्या गल्लीत बैलांना रांगेत लावण्यात आले व डप वाजताच बैलांच्या शर्यतीस सुरुवात झाली. खालची गल्ली ते गांधी चौकपर्यंतचा पहिला पोळा लंकेश वाघ याने, तर जि.प.मराठी शाळेच्या रिक्षा स्टॉपजवळून तर खाटीक वाड्यापर्यंतचा पोळा पंकज कोळी याने बैलास घेऊन शर्यत जिंकली.
पोळा बघण्यासाठी आबालवृद्धांची, महिलांची दुतर्फा प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक जणांनी घराच्या छतावरून, मोबाइल टॉवरवरून पोळ्याची शर्यत पाण्याचा आनंद लुटला.
दरम्यान, मागील वर्षी पोळ्या सणाला गालबोट लागले होते व अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व तालुका पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, आरसीसी प्लॅटून जवळपास १०० ते १५० पोलिसांचा फौजफाटा गावात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, घोड्याची शर्यत जिंकणाºयांना मानाचे प्रत्येकी पाच-पाच नारळ व रोख बक्षीस पोलीस पाटील राजू सपकाळे यांच्याहस्ते देण्यात आले. पोळा सण शांततेत पार पडावा याकरिता गावातील सर्वच राजकीय पुढाºयांनी एकोप्याने पुढाकार घेतला होता.