चहार्डी येथील ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा दूर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:20 PM2018-05-19T19:20:32+5:302018-05-19T19:20:32+5:30
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कोल्हापूर पद्धतीचा गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित झाला असून शासनाच्या पैशांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचीही बंधाऱ्याविषयी अनास्था असल्याने संताप व्यक्त होत आहे.
लोकमत आॅनलाईन
संजय सोनवणे
चोपडा, दि.१९ : एकीकडे आपल्या भागातील नदीवर बंधारे उभारावेत यासाठी काही गावातील ग्रामस्थ वारंवार उपोषण करीत असतांना मात्र चहार्डी येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बंधाºयाकडे तब्बल पंधरा वर्षांपासून दूर्लक्ष झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एकदाच पाणी साठवण झालेला हा बंधारा किरकोळ दुरूस्तीच्या उपेक्षेमुळे आज मरणप्राय अवस्थेत उभा असून लोकप्रतिनिधींसह गावकºयांच्याही अनास्थेचा तो बळी ठरला आहे. यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सद्याच्या पाणी टंचाईच्या काळात थेंब थेंब पाण्याला महत्व आले आहे. मात्र पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे चहार्डी. ता चोपडा येथील चंपावती व रत्नावती नद्यांच्या संगमापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा दुर्लक्षित झाला आहे.
हस्तांतरणदेखील नाही
विशेष म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी काम पूर्ण झालेला हा बंधारा बांधून लघु सिंचन विभागाकडून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणाची औपचारिकताही पूर्ण करण्यात आलेली नाही. यात शासनाचा ९० लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी आणण्यात आलेल्या लोखंडी फळ्या वापर न झाल्याने जागेवरच पडून पडून अखेर सडून गेल्यात. काही फळ्या ग्रामस्थांनी बसण्यासाठी बाकडा करण्यासाठी पळवून नेल्या आहेत तर काही फळ्या भंगार चोरांनी चोरून नेल्या आहेत. मात्र याबाबत स्थानिक आजी माजी पदाधिकाºयांना, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना काहीच सोयरं सुतक नसल्याचे चित्र सध्यातरी समोर आले आहे. शासनाने एवढा मोठा निधी खर्च करून बंधारा बांधला खरा, परंतु त्याची देखभालीची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे सरसावत नसल्याने पाणी अडविण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. सध्या चहार्डी गावातच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी काहीच हालचाल होत नसेल तर ते येथील ग्रामस्थांचे दुर्भाग्य समजावे लागेल.
खासदारांनाही पडला विसर
दरम्यान, गेल्या वर्षी २९ जून रोजी येथील दोन्ही नद्यांना महापूर आल्याने व बंधाºयात कचरा अडकून चहार्डी गावात पाणी घुसून हानी झाली होती. त्यावेळी खासदार रक्षा खडसे पाहणीसाठी आल्या असता त्यांनी कोल्हापुरी बंधाºयाची उंची कमी करण्याचे आश्वासन बाधित ग्रामस्थांना दिले होते. मात्र खडसे यांना याचा विसर पडल्याने या बंधाºयाची ना उंची कमी करण्यात आली, ना हा बंधारा अधिकाºयांच्या सांगण्यानुसार दुरुस्त करण्यात आला. जे येतात ते केवळ भेट देऊन जातात व वेळ मारून नेतात. आता पावसाळा सुरू होण्याची वेळ येऊन ठेपली तरी कोणताच निर्णय झाला नसल्याने पुन्हा नद्यांचे पाणी गावात घुसेल आणि तोच कित्ता गिरवला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र या विषयावर गावातील जाणकार नागरिक एकत्र येऊन आवाज उठविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजले आहे. या प्रश्नाकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.