मौजमस्तीसाठी ‘बंटी-बबली’ने चोरल्या तब्बल २५ दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 10:42 AM2020-07-22T10:42:20+5:302020-07-22T10:42:34+5:30
एलसीबीकडून पर्दाफाश : शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर दुचाकींची विक्री, वेगवेगळ््या ठिकाणाहून घेतले ताब्यात
जळगाव : कमी श्रमात अधिक पैसा मिळवायचा व त्यात मौजमस्ती करायची यासाठी निवृत्ती उर्फ छोटू सुकलाल माळी (४८,धरणगाव) व हेमलता देविदास पाटील (३४, रा.अमळनेर) या ‘बंटी-बबली’च्या जोडीने जिल्ह्यात तब्बल २५ दुचाकी चोरी केल्या असून त्याची विक्री शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अगदी कमी भावात केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बंटी-बबलीचा मंंगळवारी भांडाफोड केला आहे.
धरणगाव येथील एक पुरुष व अमळनेर येथील महिला धरणगावात स्टॅम्प पेपर तयार करुन चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे व अशरफ शेख यांना मिळाली होती. या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना गुन्ह्याची पध्दत, आरोपीचा इतिहास व दुचाकी कुठे कुठे विक्री झाल्या आहेत, त्याची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार रोहोम यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, हवालदार संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे ,अशरफ शेख, दत्तात्रय बडगुजर, विनायक पाटील, किरण चौधरी, महेश महाजन, पल्लवी मोरे, वैशाली पाटील, राजु पवार, इद्रीस पठाण तसेच सहायक फौजदार विजय पाटील,श्रीकृष्ण पटवर्धन व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाला ही जबाबदारी सोपविली. या पथकाने सर्वात आधी छोटू याला पलायन करण्यापूर्वीच धरणगाव-अमळनेर रस्त्यावरुन ताब्यात घेतले तर हेमलता हिला अमळनेरातून ताब्यात घेतले.
हेमलताचा वेश पुरुषासारखा... हेमलता हीच वेश हा पुरुषासारखाच आहे. पुरुषाचेच कपडेही परिधान करते, त्यामुळे ती महिला आहे हे लवकर कळत नाही. बनावट चावीने दुचाकी चोरली की काही अंतरावर थांबलेल्या छोटूला घेऊन स्वत: दुचाकी चालवून रफूचक्कर व्हायचे. हेमलता हिच्याविरुध्द याआधी रामानंद नगर पोलीस ठाण्यात देखील दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, दोघांना एरंडोलच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यात आले असून मंगळवारी एरंडोल न्यायालयाने २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
समलिंगी प्रकरणात झाली ओळख
काही वर्षापूर्वी समलिंगी तरुणींच्या प्रेमप्रकरणाचे प्रकरण धरणगावात घडले होते. या प्रकरणात छोटू याने हेमलता हिला मदत केली होती. तेव्हापासून दोघांमध्ये ओळख व मैत्रीचे संबंध निर्माण झाले. हेमलता हिने १० वर्षापूर्वी पतीपासून घटस्फोट घेतला आहे. १५ वर्षाच्या मुलासोबत ती अमळनेरात वास्तव्य करते तर छोटू हा विवाहित असून त्याला दोन मुले व एक मुलगी आहे. हेमलता अमळनेर येथून धरणगावात यायची व तेथून छोटूला सोबत घेऊन दोघंही जळगाव, एरंडोल, चाळीसगाव या भागात दुचाकी चोरी करायला जायचे. विक्रीच्या पैशातून मौजमस्ती करायचे.
चोरीची वस्तू आहे हे माहिती असूनही ती विकत घेणे गुन्हा आहे. त्यामुळे या २५ दुचाकी विकत घेणाऱ्या सर्वच लोकांना या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. यापुढे देखील गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना आरोपी केले जाणार आहे. जनतेने देखील लोभामुळे कमी किमतीत व स्वस्त मिळते म्हणून वस्तू घेवू नये.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक