दहावी-बारावीच्या को-या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:15 AM2021-04-21T04:15:59+5:302021-04-21T04:15:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न ...

The burden of 10th-12th standard answer sheets on schools | दहावी-बारावीच्या को-या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा

दहावी-बारावीच्या को-या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न होता ती पुढे ढकलण्‍यात आली आहे. दुसरीकडे माध्‍यमिक व उच्च माध्‍यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे साहित्य आठ ते दहा दिवसांपूर्वीच शाळांकडे सोपविले आहे. ते सांभाळून ठेवण्‍याची जबाबदारी शाळांवर येवून पडली आहे. मात्र, शाळा बंद असल्यामुळे मुख्‍याध्‍यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.

माध्‍यमिक व उच्च माध्‍यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २३ तर बारावीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर सिटिंग प्लॅन, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, राज्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्‍याचा निर्णय जाहीर केला आहे. दुसरीकडे आता परीक्षा कधी होतील, हा प्रश्न देखील विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. परीक्षेसाठीचे साहित्य सध्या शाळांकडे आहे. हे साहित्य जोखमीचे असल्यामुळे जिल्ह्यातील मुख्‍याध्‍यापकांचा ताप वाढला आहे. उत्तरपत्रिका व साहित्य कस्टडीत ठेवण्‍यात आले आहे. या साहित्यावर चोरांची नजर पडू नये व ते खराब होवू नये, यासाठी मुख्‍याध्‍यापकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शाळा बंद असताना सुध्दा उत्तरपत्रिका सांभाळण्‍याची महत्वाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना शाळेत जावे लागत आहे.

====================

-दहावीतील विद्यार्थी : ५८,५१८

-बारावीतील विद्यार्थी : ४८,४००

===================

- हे साहित्य कस्टडीत

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए, बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमिक बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदी.

=================

परीक्षा कधी?

यापूर्वी दहावीची परीक्षा २३ एप्रिल व बारावीची परीक्षा २९ एप्रिलला जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. विशेष म्हणजे, पुढे या परीक्षा कधी होणार यासंदर्भात अद्यापतरी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

===================

- पुढील प्रवेश कधी?

साधारणत: दहावी-बारावीची परीक्षा ही मार्च, एप्रिल महिन्यामध्ये होते. यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून त्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, त्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे त्या कधी होतील, याबाबत सध्यातरी संभ्रम आहे. दरम्यान, परीक्षाच झाल्या नसल्याने आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, त्यानंतर पुढील वर्गातील प्रवेश याबाबत सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

===================

- अभ्यास कधीपर्यंत करायचा ?

मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करत अभ्यास केला. आता परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्यामुळे ते सराव करत होते. आता परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे अभ्यास पुन्हा किती दिवसांपर्यंत करायचा, असा प्रश्न ते उपस्थित करत आहे.

==================

- मुख्याध्यापक म्हणतात....

ग्रामीण भागात शाळा आहे. त्यामुळे परीक्षेचे साहित्य खराब होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. उत्तरपत्रिका एका खोलीत तर साहित्य कपाटात सील केले आहे. महत्वाची जबाबदारी असल्यामुळे दररोज शाळेत जावे लागते.

- उत्तम चिंचाळे, मुख्‍याध्‍यापक

दहावी बारावीचे साहित्य चोरीला जावू नये यासाठी म्हणून संपूर्ण उत्तरपत्रिका व इतर साहित्य कस्टडीत सील बंद केले आहे. दहावी-बारावीची परीक्षांची तारीख निश्चित झाली होती. त्यामुळे मंडळाने परीक्षेचे साहित्य काही दिवसांपूर्वीच पाठविले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता टिकून रहावी, यासाठी परीक्षा होणेही महत्वाचे आहे. मात्र, या परिस्थितीत परीक्षा होतील की नाही, हा सुध्दा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

-विजय सोनवणे, मुख्‍याध्‍यापक

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होणार असल्यामुळे आठ ते दहा दिवसांपूर्वी उत्तरत्रिका व इतर साहित्य शाळेला प्राप्त झाले आहे. पण, आता परीक्षा लांबणीवर गेली आहे. संपूर्ण साहित्य जपून ठेवावे लागणार आहे. त्यासाठी ते शाळेच्या कस्टडीत सील बंद केले आहे. परीक्षाचे वेळापत्रक जाहीर होताच, कस्टडी उघडण्यात येईल.

- दुर्गादास मोरे, मुख्‍याध्‍यापक

Web Title: The burden of 10th-12th standard answer sheets on schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.