गरिबांचा बर्गर महाग झाला; वडापाव आता १५ रुपयांना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:46+5:302021-08-29T04:18:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नाश्ता म्हणून असो की रोजंदारी करून पोट भरणाऱ्यांसाठी आधार असो, यासाठी वडापावला पहिली पसंती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नाश्ता म्हणून असो की रोजंदारी करून पोट भरणाऱ्यांसाठी आधार असो, यासाठी वडापावला पहिली पसंती असून, शहरातील मुख्य बाजारपेठेसह कॉलनी भागातही वडापाव खवय्यांच्या आवडीला उतरला आहे. घटक पदार्थांचे भाव वाढून वडापावचे भाव काहीसे वाढले असले तरी भजी, कचोरी, समोसा यापेक्षा वडापावकडेच अधिक कल दिसून येतो.
नोकरी, व्यवसायानिमित्त अथवा बाहेर गावी जात असताना घरातून लवकर बाहेर पडल्यानंतर नाश्ता म्हणून अनेकजण बाहेर वेगवेगळे पदार्थ खात असतात. यात गेल्या काही दिवसांपासून वडापावची चांगलीच चलती असून, त्याची ठिकठिकाणी दुकानेदेखील थाटली आहेत. यात अनेक दुकाने तर खवय्यांचे एकमेकांना भेटणे व सोबत नाश्ता करण्याचे नेहमीचे ठिकाण बनले आहे. तसे नाश्त्यामध्ये अनेक पदार्थ आज उपलब्ध आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे खात असतो. मात्र, त्यात वडापावला अधिक पसंती असल्याचे अनेक खवय्यांनी सांगितले.
म्हणून महागला वडापाव
गेल्या काही दिवसांपासून अनेक वस्तूंचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम खाद्यपदार्थांवरही होत आहे. वडापावसाठी लागणाऱ्या खाद्य, तेल, बेसन पीठ, बटाटे, मसाले यांचे भाव वाढत गेल्याने वडापावचेही भाव वाढत आहे. पूर्वी १० रुपयांना मिळणारा वडापाव आता १५ रुपयांना एक मिळत आहे. खाद्यतेल ११० रुपयांवरून १५५ रुपयांपर्यंत, तर बेसन पीठही ९० रुपयांपर्यंत पोहोचल्याने हा फरक पडत असल्याचे सांगितले जात आहे.
वडापावशिवाय दिवस जाणे कठीण
वडापाव हा आवडीचा पदार्थ असण्यासह सकाळी तो खाल्ल्यानंतर भुकेची चिंता राहत नाही. दुपारी जेवणाला उशीर झाला तरी वडापावमुळे भूक जाणवत नाही. वडापावचा दिवसभर पोटाला आधार असतो.
- राजेश पवार
अनेक पदार्थ आज नाश्त्यासाठी उपलब्ध असले तरी वडापाव चवीच्या बाबतीत आवडण्यासह पोटाला व खिशालाही परवडणारा आहे. नाश्ता म्हणूनच नाही, तर सोबत जेवणाचा डबा नसला तरी वडापाव खाल्ल्यानंतर आधार होतो.
- शिवाजी शिंदे
वडापावला आजही चांगली मागणी असून, दररोजच्या ग्राहकांसह बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे ग्राहक वडापाव खायला हमखास येतात. कोरोना काळात व्यवसाय मंदावला होता. मात्र, आता तो पूर्ववत झाला आहे.
- दत्तात्रय शिरसाळे, वडापाव विक्रेते
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक दिवस दुकान बंद राहिले. तसेच दुसऱ्या लाटेतही मार्च ते मे महिन्यांत चांगलाच परिणाम जाणवला. जूनमध्येदेखील व्यवसाय निम्म्यावरच होता. आता मात्र ग्राहकी चांगली आहे.
रमेश ठाकरे, वडापाव विक्रेते.