पारोळ्यात दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 12:26 AM2017-04-13T00:26:56+5:302017-04-13T00:26:56+5:30

गुन्हा दाखल : भरदिवसा होत असलेल्या घरफोड्यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Burglar at two places in Parola | पारोळ्यात दोन ठिकाणी घरफोडी

पारोळ्यात दोन ठिकाणी घरफोडी

Next

पारोळा : शहरात घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी भरदिवसा घरफोडी झाली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच बुधवारी पुन्हा चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
मंगळवारी येथील डी.डी.नगर भाग २ मध्ये राहणारे अ‍ॅड.वेदव्रत काटे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास ४५ हजारांचा ऐवज लंपास केला होता. कॉलनी भागात भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेतील चोरांचा तपास लागत नाही तोच चोरट्यांनी आज पुन्हा दोन ठिकाणी घरफोडी करून पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.
बुधवारी  व्यंकटेशनगरातील प्रा. व्ही.एन. कोळी यांच्या कुटुंबातील सदस्य तामसवाडी येथे गेले होते. घराला कुलूप होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी कपाटातील पाच हजार रुपये रोख, होम थिएटर, गॅस हंडी चोरून नेली.
प्रा.कोळी यांच्या घरी तीन चोरटे कारने आले होते. ते गॅस हंडी कारमध्ये ठेवत असताना हंडी ठेवण्याचा जोरात आवाज झाला. तो आवाज ज्ञानेश्वर पाटील यांनी ऐकला. ते घरातून बाहेर येईपर्यंत चोरटे कारसह पसार झाले होते.
दुसरी चोरीची घटना पारोळा-चोरवड रस्त्यावरील संजय दौलत महाजन यांच्या घरी घडली. ते साखरपुड्याच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा चोरांनी घेतला. चोरट्यांनी घरातून पाच ग्रॅम सोने, तीन भार चांदीच्या अंगठ्या, ११ हजार रुपये रोख, होम थिएटर, मोबाइल असा जवळपास ४० हजारांचा ऐवज लंपास केला.
या दोन्ही घरफोडीतून चोरट्यांनी जवळपास ६० हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.
पोलिसांकडून पाहणी
या दोन्ही घरफोडीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चौधरी, सुनील साळुंखे आदींनी पाहणी केली. प्रा.व्ही.एन. कोळी यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आर.जे. दहीहंडे  करीत आहेत.
दिवसाही पेट्रोलिंग करावी
शहरात सलग दोन दिवशी भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी दिवसाही पेट्रोलिंग करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून आता व्यक्त होत आहे.          (वार्ताहर)

Web Title: Burglar at two places in Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.