एकाच रात्रीतून १८ ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 11:42 PM2017-01-17T23:42:27+5:302017-01-17T23:42:27+5:30

लासूर/गणपूर : पोलिस दप्तरी मात्र दोन्ही ठिंकाणी एक-एक घरफोडी झाल्याची नोंद, ग्रामस्थांमध्ये भीती

Burglary at 18 places from the same night | एकाच रात्रीतून १८ ठिकाणी घरफोडी

एकाच रात्रीतून १८ ठिकाणी घरफोडी

Next

लासूर/चोपडा : तालुक्यातील लासूर येथे  एका रात्रीतून आठ तर गणपूर येथे १० ठिकाणी घरफोड्या करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान पोलीस दप्तरीमात्र लासूर व गणपूर येथे प्रत्येकी एक-एक ठिकाणी चोरी झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. या घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असून, गावात रात्री लवकरच शुकशुकाट होत असतो. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.
लासूर येथील योगेश काशिनाथ शिरसाठ हे गेल्या दोन दिवसांपासून गावाला गेले होते. त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील रोख ३०० रूपये लंपास केले. तर नारायण नामदेव शिंपी हे देखील १० दिवसांपासून गावाला गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी गॅस कटरने तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले २५ तोळे सोने, पाच हजार रूपये रोख लंपास केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला फक्त ६४ हजार रूपये किंमतीचे ३३ ग्रॅम सोने लंपास झाल्याची नोंद आहे.  तसेच प्रेमराज दगडू सोनार यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तीन तोळे सोने, २० हजार रूपये रोख लंपास केले. सोनार यांचे दुकान असून, चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून साड्या-कपडे लंपास केले आहेत. मात्र याची नोंद नाही.
याचबरोबर युवराज सीताराम बाविस्कर हे देखील आठ दिवसांपासून बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरातून चोरट्यांनी १५०० रूपये रोख लंपास केले. तसेच भागरथाबाई राजाराम मगरे, पंचायत समिती सदस्य अनिल हिंमतराव पाटील यांच्या घरातूनही किरकोळ रक्कम गेली. तर सजन ठाकूर, ताराचंद महादू कोळी यांचेही घर चोरट्यांनी फोडले.
गणपुरलाही १० ठिकाणी चोरी
 गणपुर येथे प्रतिभाबाई अशोक पाटील यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने तोडून कपाटातील १८ हजार ५०० रुपये सोन्याचे दागिने चोरले.रमेश माधवराव पाटील यांच्या घरातून रोख १० हजार, कैलास पाटील यांच्याकडील ३७ हजार रोख लंपास केले आहेत.  तसेच शिवाजी दगडू पाटील , सुधाकर जुलाल पाटील , सुरेश वाना पाटील , मोहित कृषी केंद्र, एकविरा फर्टिलायझर ,मृत्यूनंजय मेडिकल व नारायण नाना दूध उत्पादक सोसायटी येथे चोरट्यानी दरवाजे फोडलेत. मात्र तेथील रकमेची नोंद नाही. लासूर येथील फक्त एकाच चोरीची नोंद आहे. याबाबत प्रतिबाबाई अशोक पाटील (गणपूर) यांचे फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहेत.
 पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आहे.                 (वार्ताहर)   
लासूर येथे सायंकाळच्यावेळी जळगाव येथून श्वानपथक दाखल झाले होते. या श्वानाने परिसरात थोड्या अंतरापर्यंत मार्ग दाखविला. मात्र नंतर ते श्वान परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाचे ठसे घेतले.
४ लासूर व गणपूर येथे एकाच रात्री झालेल्या घरफोड्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. चोपडा ग्रामीण पोलीसांनी रात्रीची गस्त सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

Web Title: Burglary at 18 places from the same night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.