नागरिक दवाखान्यात चोरटे घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:01 PM2021-04-13T23:01:53+5:302021-04-13T23:02:38+5:30
अमळनेरात नागरिक दवाखान्यात आणि चोरटे घरात अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : नागरिक दवाखान्यात आणि चोरटे घरात अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली असून संधीचा गैरफायदा घेत चोरट्यानी दोन ठिकाणी घरफोडी करून सुमारे ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. आठवड्यात तिसरी घरफोडी आहे.
रतनदादा नगरमधील मुकेश दशरथ शिसोदे यांनी फिर्याद दिली की, १२ रोजी ते घराला कुलूप लावून पत्नी वैशालीसह धुळ्याला दवाखान्याच्या कामासाठी गेले होते. ते १३ रोजी सायंकाळी परतल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाज्याचे कुलूप तोडलेले आढळून आले. घरातील २२ हजार रोख, ९ हजार रुपयांचे लहान मुलांचे सोन्याचे दागिने तर ६ हजार रुपयांचे पायातील वाडे असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. मुकेश यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत गोसावी करीत आहेत.
गोहिल नगरच्या शेजारील त्रिमूर्ती नगर मधील सोनाली प्रवीण पाटील यांनीही फिर्याद दिली असून त्यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना धुळे येथे दाखल केले होते. ११ रोजी ते घराला कुलूप लावून गेले होते. १३ रोजी शेजारील महिलेने घराचा दरवाजा तोडलेला असल्याचे कळवल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहिले असता अज्ञात चोरट्याने ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरात दवाखान्यात असलेल्या लोकांची घरे फोडल्याचा हा तिसरा प्रकार आहे. शेजारील नागरिकांनी घरांकडे लक्ष ठेवून तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले आहे.