पारोळ्यात वकिलाच्या घरी चोरी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 02:52 PM2021-02-17T14:52:14+5:302021-02-17T14:54:28+5:30
न्यू बालाजी नगरमधील वकिलाच्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील दीड लाख रुपयांसह मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : नवसाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेलेल्या न्यू बालाजी नगरमधील वकिलाच्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरातील दीड लाख रुपयांसह मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना घडली.
पारोळा शहरातील सतीश नानाभाऊ पाटील (रा. न्यू बालाजी नगर पारोळा) हे दिनांक १६ रोजी आपल्या मूळ गावी नेरी ता. पाचोरा येथे आपल्या पुटण्याचा नवसाच्या कार्यक्रमानिमित्त परिवारासह गेले होते. याचे औचित्य साधत दिनांक १६च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचा पुढचा दरवाजाचा कडीकोडा तोडून घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला व घरातील कपाटात असलेल्या बॅग व पर्स मधील असलेले ८० हजार रुपये रोख, नऊ ग्रॅम सोने डोंगल, सात भार चांदीचा गोप व शिक्के होते असे एकूण एक दीड लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले.
चोरट्यांनी ही चोरी करून घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. याबाबत शेजारी राहत असल्याना पहाटे उठल्यानंतर ही घटना लक्षात आली. त्यानंतर सतीश पाटील यांना फोन करून कळवले. ते घरी आल्यानंतर पारोळा पोलिसात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.