पोलीस कर्मचाऱ्याकडेच घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:42 PM2020-01-27T22:42:24+5:302020-01-27T22:42:41+5:30
रायसोनी नगरातील घटना : ७० हजाराचा ऐवज लांबविला
जळगाव : महामार्ग सुरक्षा पथकात चाळीसगाव येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नरेश भिका सोनवणे (३५) यांच्या रायसोनी नगरातील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ४२ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश सोनवणे महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत आहेत. रायसोनी नगरातील साई विहीरनजीक प्लॉट क्र.४६४ मध्ये पत्नी अश्विनी, मुलगी पूर्वा व मुलगा देवांशु अशांसह वास्तव्याला आहेत. २६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता ते घराला कुलुप लावून परिवारावस मोहाडी, ता.जळगाव या मुळ गावी गेले होते. सोमवारी सकाळी घरी परतले असता दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले होते व कडी कोयंडा तुटलेला होता. टॅमीच्या सहाय्याने कुलुप व कडी तोडलेली होती. फ्रिजवर ठेवलेली पर्स व बेडरुममधील कपाट तुटलेले होते. कपाटातील ४२ हजार रुपये रोख १० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गायब झालेला होता. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सोनवणे यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.