सावखेडा खुर्द गावी आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:31 PM2020-12-06T16:31:45+5:302020-12-06T16:36:11+5:30
पाचाेरा तालुक्यातील सावखेडा खुर्द गावी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रमेश गुलाब परदेशी यांच्या घराला लागलेल्या आगीत ९० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तसेच संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरखेडी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या सावखेडा खुर्द गावी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रमेश गुलाब परदेशी यांनी आपल्या १० एकर शेतात पिकविलेला कापूस आपल्या डांभूर्णी रोडला लागून सिमेंट वीट व पत्र्याचे असलेल्या राहत्या घरात ९० क्विंटल कापूस भरून ठेवलेला होता. ते आपल्या घरात असलेल्या कापसाला योग्य भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना अकस्मात कापसाला आग लागून मोठे नुकसान झाले.
या आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तसेच घरातील रोख रक्कम २५ हजार रुपये व संसारोपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यात पावणेसहा लाखाचे नुकसान झाले. घरात असलेल्या रॅकवरील व पदीवर ठेवलेले भांडे अक्षरश: वितळून पाणी झाले. तसेच घरातील सर्व अन्नधान्यदेखील या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे रमेश गुलाब परदेशी यांचा परिवार उघड्यावर आला.
आगीची वार्ता कळताच गावातील ग्रामस्थ या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा करू लागले. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने आग विझविण्यात बाधा येत होती. सुमारे तासभर अग्नितांडव सुरू असताना सायंकाळी पाचोरा येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आली. परंतु तोवर होत्याचे नव्हते झाले होते.
या शेतकऱ्याच्या संसाराची पूर्णतः राखरांगोळी झाली होती. शेतकरी व त्याचा परिवार धायमोकलून रडत होते. तलाठी किरण मेदान यांनी रविवारी सकाळी ९:३० वाजता घटनास्थळी जावून पंचनामा केला.