सुरक्षा पेटीला लागलेल्या आगीत दहा मीटर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:17+5:302021-06-05T04:12:17+5:30
महावितरणतर्फे वीज चोरीला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी वीज चोरीचे प्रमाण असलेल्या सुप्रीम कॉलनी, रामवाडी, हुडको परीसर, कांचन नगर ...
महावितरणतर्फे वीज चोरीला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी वीज चोरीचे प्रमाण असलेल्या सुप्रीम कॉलनी, रामवाडी, हुडको परीसर, कांचन नगर व शिवाजी नगर या भागातील नागरिकांचे वीज मीटर घराबाहेर बसविण्यात आले आहेत. एका खांबावर साधारणतः ८ ते १० नागरिकांचे मीटर बसवून, त्यावर सुरक्षिततेसाठी फायबर प्लॅस्टिकची पेटी बसविली आहे. तसेच या पेटीला बाहेरून कुलूपही लावले आहे. ज्यामुळे नागरिकांना मीटरमध्ये फेरफार करता येणार नाही, अशा प्रकारचे नियोजन केले आहे. मात्र, शुक्रवारी पहाटे शिवाजी नगरात एका विद्युत खांबावर बसविण्यात आलेल्या वीज मीटर पेटीला अचानक आग लागली. या आगीत येथील दहा नागरिकांच्या घराचे वीज मीटर अवघ्या दहा मिनिटांत खाक झाले. परिणामी यामुळे नागरिकाचांही वीजपुरवठा खंडित झाला आहे.
इन्फो :
तर विरोध असल्यामुळे ‘आग’ लावली असल्याचा अभियंत्याचा दावा
या आगीबाबत या भागातील महावितरणचे सहायक अभियंता हर्षल इंगळे यांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारले असता, इंगळे यांनी वीज चोरीला आळा घालण्यासाठी नागरिकांचे मीटर घराबाहेर वीज खांबावर बसविले आहे. मात्र, सुरुवातीपासूनच वीज मीटर बाहेर लावण्याला नागरिकांचा विरोध होता. त्यामुळे विरोध करणाऱ्यानींच ही आग लावली आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या पेट्या बसविल्या आहेत. त्या ठिकाणी उष्णतेमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्रकार घडलेला नाही. शिवाजी नगरातच दोनदा हा प्रकार घडला. फेब्रुवारी महिन्यातही शिवाजी नगरात या पेटीची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस तक्रार अर्ज दिला आहे. तर आताही ज्या नागरिकांमधून विरोध होत आहे. त्यांनीच वीज मीटर पेटीला आग लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत आपण पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार करणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.
इन्फो :
तर शॉर्ट सर्किट किंवा उष्णतेमुळे आग लागल्याचा नागरिकांचा दावा
चार दिवसांपूर्वी लाकूडपेठेत एका खांबावर बसविण्यात आलेल्या वीज मीटर पेटीला दिवसाढवळ्या आग लागली होती. तर आता पुन्हा शिवाजीनगर लाकूड पेठेजवळच एका वीज मीटर पेटीला ही आग लागली. महावितरणतर्फे बसविण्यात आलेल्या फायबरच्या प्लॅस्टिक पेट्या उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेतून पेट घेत असाव्यात किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या भागातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी स्वत: आठवडाभरात दोनदा लागलेल्या आगीबाबत या वीज मीटर पेट्या काढण्याबाबत महावितरणकडे तक्रार केली आहे. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दारकुंडे यांनी दिला आहे.