जळतिये आगी घालिती उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 09:52 PM2019-02-03T21:52:05+5:302019-02-03T21:52:22+5:30
माऊली ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या नवव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकावर निरूपण करताना एका दृष्टांताच्या साहाय्याने विषय समजावून सांगत आहेत. स्वस्वरूपाचे ज्ञान ...
माऊली ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या नवव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकावर निरूपण करताना एका दृष्टांताच्या साहाय्याने विषय समजावून सांगत आहेत. स्वस्वरूपाचे ज्ञान हे खरे ज्ञान आहे. ते फार कष्टसाध्य आहे असेही नाही. प्रत्येकाच्या आवाक्यात असणारे, सुखाचा अनुभव देणारे हे ज्ञान विकाररहीत असून एकदा प्राप्त झाले तर पुन्हा विसरले न जाणारे, कमी न होणारे, क्षय न पावणारे असे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे.
लोकांच्या अनुभवातून ज्ञानासारखी ही श्रेष्ठ वस्तू कधी सुटली? अशी शंका अर्जुनाला येऊ शकते. तिचे उत्तर ही पुढे माऊली देतात. परंतु ही शंका उपस्थित करण्याच्या निमित्ताने मनुष्य स्वभावाचे लोक-रहाटीचे मोठे सुंदर वर्णन माऊलींनी या ओवींच्या पूर्वाधात केले आहे. लोक तरी कसे असतात. ‘एकोत्तराचिया वाढी । जळतिये आगी घालिती उडी । एक टक्का जास्त व्याज मिळत असेल तर सर्वस्व पणाला लावणारे जळत्या आगीत उडी घेणारे - थोड्याशा लाभासाठी काहीही करायला तयार होणारे !
माझ्या स्टाफमध्ये एक सहकारी होते. कर्मचारी पतसंस्था सभासद हित लक्षात घेऊन अत्यल्प व्याजदराने कर्ज देत असे या सहकाºयाची आर्थिक स्थिती तशी बरी होती. कर्जाची त्यांना आवश्यकता नसायची. तरीही तो दर सहा माहिला मिळेल तितके कर्ज घेत. सहज चौकशी केली तेव्हा ते म्हणाले, ‘‘इथे सहा टक्के व्याजाने घेतलेले हे पैसे मी दुसºया पतसंस्थेत आठ टक्के व्याजाने मुदत ठेवीत टाकतो. हे कर्ज पगारातून फिटेल. मला काहीही न करता दोन टक्के व्याज अधिक मिळत असेल तर मी ते का सोडावे? अशा रितीने दोन लाखाची मुदतठेव केली आहे. दोन टक्के व्याज विनासायास मिळवण्यासाठी कर्ज घेणाºया त्या महात्म्याला मनोमन वंदन केले. पुढे झाले असे की अनियमित आर्थिक व्यवहार व विनातारण भरमसाठ कर्ज देणारी ती पतसंस्था पूर्णपणे बुडाली आणि त्याची सर्व रक्कम मुद्दलासह बुडीत झाली. आता तो ठेवीदार संघटनेचा सभासद होऊन मिळतील तितके पैसे मुद्दलात तोटा स्वीकारून चकरा मारतो आहे. म्हणून इथे माऊलींची ही ओवी आठवली. किंचित लाभासाठी लोक सर्वस्व पणाला लावतात. मोठा धोका पत्करतात.
संतांनी अर्थ हा अनार्थासारखाच मानला आहे. तरी आपल्याला त्यांनी अर्थसावध होण्यासाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. हे व्यावहारिक शहाणपण शिकण्यासाठी तरी आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे.
- प्रा. सी.एस.पाटील, धरणगाव