वरखेडीत बस घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 04:28 PM2019-06-01T16:28:23+5:302019-06-01T16:29:02+5:30
प्रवासी बालंबाल बचावले : साईडपट्या नसल्याने घडली घटना
वरखेडी, ता.पाचोरा : वरखेडी येथे रस्त्यावरून बस घसरली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. साईडपट्या भरल्या नसल्याने ही घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे.
वरखेडी स्थानक ते बहुळा नदीवरील पुलापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. साईडपट्ट्या न भरल्यामुळे शुक्रवारी सकाळी १०.१५ ते १०.३० वाजेच्या दरम्यान पाचोरा कडून राजुरी मार्गे पिंपळगाव (हरेश्वर) कडे जाणारी बस रस्त्याला लागून उभ्या असलेल्या पाण्याने भरलेल्या ट्रँकर जवळून पास करत असतांना रस्त्याच्या शेजारी असलेल्या नालीत घसरली. जवळजवळ दोन ते तीन फूट उंच रोड असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या ओट्यांना ही बस जाऊन थांबली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते सर्वांची एकच घाबरगुंडी उडाली, अशी माहिती चालक दीपक शेवरे व वाहक जी.डी.साठे यांनी दिली.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाचोरा येथील कनिष्ठ अभियंता डी.एम.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या बस घसरण्याच्या घटनेची माहिती कळवून साईडपट्ट्या नसल्यामुळे हा प्रकार झाल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. ते सर्वच सुदैवाने बचावले. बस घरांच्या भिंतीला लागून थांबली अन्यथा घरांच्या भिंती पडून देखील मोठी हानी झाली असती, असे सांगण्यात आले.