भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे महामार्गाच्या वाहनाची बसला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 04:41 PM2019-08-18T16:41:57+5:302019-08-18T16:44:20+5:30
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मिक्सर वाहनाने बसला धडक दिली. यात प्रवाशांना इजा झालेली नसली तरी पुढे जाण्यात मोठा खोळंबा झाला.
भुसावळ, जि.जळगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मिक्सर वाहनाने बसला धडक दिली. यात प्रवाशांना इजा झालेली नसली तरी पुढे जाण्यात मोठा खोळंबा झाला. प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. तसेच वाहतूक विस्कळीत झाली. शनिवारी सायंकाळी सातला साकेगाव येथे बसस्थानक चौकात ही घटना घडली.
धुळे येथून बुलढाणाकडे जाणारी बस (क्रमांक एमएच-४०-क्यु-६२५०) भुसावळकडे जात होती. याचवेळी साकेगाव बसस्थानकावर महामार्ग चौपदरीकरण करणाºया कामाचे मिक्सर (क्रमांक एनएच-१९-सीवाय-२९४५) या वाहनाचे गियर पुढे न पडता मागे पडले. यामुळे सिमेंटने भरलेले वाहन पुढे न जाता मागे येणाºया बसवर अचानक धडकले. या घटनेमुळे बसमध्ये बसलेल्या ३७ प्रवाशांना धक्का बसला. घटनेमुळे बसच्या क्लिनर साईडच्या काचा फुटल्या. यावेळी प्रवाशांनी एकच ओरड केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटना घडताच साकेगावचे नागरिक अगदी क्षणार्धात घटनास्थळी पोहोचले व घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला.
आजारी व तत्काळ कामासाठी जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल
लांब पल्ल्याच्या धुळे बुलढाणा बसमध्ये वयोवृद्ध, आजारी मंडळी तसेच शासकीय कामानिमित्त जाणाºया तरुणांचे बस अपघातामुळे हाल झाले. बसचालक नंदलाल राठोड व वाहक काटकर यांनी इतर बसेसला थांबवण्याचे प्रयत्न केले. परंतु बसेस थांबल्या नाही. या घटनेमुळे बसमधील प्रवासी पर्यायी बसची व्यवस्था लवकर न झाल्यामुळे ताटकळत साकेगाव स्थानकावरच थांबले. सुदैवाने या घटनेमध्ये एकाही प्रवाशाला इजा झाली नाही.
वाहतूक विस्कळीत
या घटनेमुळे महामार्गावर बघ्यांच्या गर्दीमुुळे व वाहनांच्या रांगेमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पो.हे.काँ. विठ्ठल फुसे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक साकेगावकºयांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली.
बस व मिक्सर वाहन पोलीस ठाण्यात
अपघातग्रस्त बस व मिक्सर वाहन यास तालुका पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी पोलीस ठाण्यात हलवले.